

Modi Government: कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनामुळं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर केंद्र सरकारनं पहिली प्रतिक्रिया दिली आहे. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी ही प्रतिक्रिया दिली असून त्यांनी विद्यार्थी आंदोलनाच्या अनुषंगानं धर्मेंद्र प्रधान यांच्या आत्तापर्यंतच्या कारकिर्दीचा देखील उल्लेख केला आहे. यातून त्यांनी प्रधान हे कसे चांगल्या प्रकारचे शिक्षण मंत्री होते हे सांगण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून येतं.
'एक्स' (X) वरील एका पोस्टमध्ये रिजिजू यांनी लिहिलं की, खरं नेतृत्व हे अनेक दशकांच्या कालावधीत मोजलं जातं आणि धर्मेंद्र प्रधान यांचा प्रवास हा सार्वजनिक जीवन व विद्यार्थी कल्याणाशी असलेल्या आजीवन बांधिलकीचा पुरावा आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात प्रधान यांच्यासोबत काम केल्याचा संदर्भ देत, रिजिजू म्हणाले की, मी धर्मेंद्र प्रधान यांची निष्ठा स्वतः अनुभवली आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांच्यासोबत काम करताना, भारताची शिक्षण व्यवस्था बळकट करण्याबाबत आणि प्रत्येक निर्णयात लाखो तरुण विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवण्याबाबत त्यांची निस्सीम निष्ठा मी पाहिली आहे. अशा महत्त्वपूर्ण क्षेत्राचं नेतृत्व करण्यासाठी प्रचंड चिकाटीची आवश्यकता असते आणि त्यांनी धैर्यानं व स्पष्ट दृष्टीकोनातून ती जबाबदारी स्वीकारली. शिक्षण मंत्री म्हणून केलेल्या कार्याबद्दल प्रधान यांचे रिजिजू यांनी आभार मानले आणि त्यांना भविष्यासाठी शुभेच्छाही दिल्या. धर्मेंद्र जी, तुमच्या अथक सेवेबद्दल, सुधारणांविषयीच्या तुमच्या कटिबद्धतेबद्दल आणि अधिक सक्षम भारत घडवण्यातील तुमच्या योगदानाबद्दल धन्यवाद. त्याच जिद्दीने आणि प्रामाणिकपणाने तुम्ही देशाची सेवा करत राहाल, यासाठी मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो, असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, धर्मेंद्र प्रधान यांनी दोन पानी राजीनामा पत्र लिहिलं असून यात ते म्हणतात, ही बाब त्यांच्यासाठी 'वैयक्तिक प्रतिष्ठेची' नव्हती आणि गेल्या १० दिवसांत घडलेल्या घटनाक्रमामुळं आपण व्यथित झालो होतो. नीट पेपरफुटीची जबाबदारी मी पहिल्या दिवसापासून स्वीकारली होती, असं सांगत त्यांनी आपला राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडं पाठवल्याचं या पत्रात म्हटलं आहे.
सातत्यानं तरुणांची सुरु असलेली आंदोलनं आणि राजकीय दबावामुळं नरेंद्र मोदी सरकारमधील एका वरिष्ठ मंत्र्याला राजीनामा द्यावा लागणं ही एक दुर्मिळ घटना आहे. एकूणच धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यामुळं जंतरमंतरवर आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. तिथं २० जूनपासून विद्यार्थी आणि CJPचे सदस्य धरणे आंदोलन करत आहेत. NEET-UG २०२६ पेपरफुटी आणि CBSEच्या 'ऑन-स्क्रीन मार्किंग' प्रक्रियेतील अनियमिततेबाबत उत्तरदायित्वाची मागणी करत आहेत. तसंच सार्वजनिक परीक्षांच्या आयोजनात व्यापक सुधारणांचीही मागणी सीजेपीनं सातत्यानं केली.
तसंच अभिजीत दिपके यानी प्रधानांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देताना, 'कॉकरोच जनता पार्टी'कडून या राजीनाम्याचं स्वागत असून आपल्या ३६ दिवसांच्या आंदोलनाचा पहिला विजय असल्याचं म्हटलं. मात्र, जोपर्यंत सरकार आपल्या उर्वरित दोन मागण्या पूर्ण करत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील. या मागण्यांमध्ये NEET पेपरफुटीमुळं आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना १ कोटी रुपयांची भरपाई देणं आणि आंदोलकांवर कोणतीही कारवाई न करणं या मागण्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या विरोधी पक्षांनी प्रधान यांचा राजीनामा हा विद्यार्थी, युवा आणि लोकशाहीचा विजय असल्याचे म्हटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.