Jagan Mohan Reddy | Sharmila Property Dispute | Bengaluru Sarkarnama
देश

YS Sharmila : माजी मुख्यमंत्र्यांच्या बहिणीला वडिलोपार्जित घरात जाण्यापासून पोलिसांनी रोखलं, कौटुंबिक वाद चव्हाट्यावर!

Jagan Mohan Reddy sister : शर्मिला या आंध्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या (एपीसीसी) अध्यक्ष आहेत. रविवारी त्या आई वायएस विजयलक्ष्मी यांच्यासोबत हैदराबादहून बेंगळुरूला पोहोचल्या. त्यांना येलाहंका पॅलेस येथे जायचे होते. मात्र, विमानतळावरच पोलिसांनी त्यांचा मार्ग अडवला. या ठिकाणी जगन मोहन रेड्डी यांचे कुटुंब वास्तव्यास आहे.

Jagdish Patil

Andhra Pradesh News, 23 Nov : आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि वायएसआर काँग्रेसचे प्रमुख वायएस जगन मोहन रेड्डी आणि त्यांच्या बहिणी शर्मिला यांच्यातील मालमत्तेचा वाद चव्हाट्यावर आला आहे. रविवारी बेंगळुरू विमानतळावर या वादाचे नाट्य पाहायला मिळाले. आईसोबत त्या त्यांच्या वडिलोपार्जित निवासस्थानी जात असताना शर्मिला यांना पोलिसांनी मध्येच रोखले. न्यायालयाच्या आदेशाचा हवाला देत पोलिसांनी त्यांना घरात प्रवेश नाकारला. या घटनेमुळे दोघांमधील कौटुंबिक वाद पुन्हा चर्चेत आला आहे.

शर्मिला या आंध्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या (एपीसीसी) अध्यक्ष आहेत. रविवारी त्या आई वायएस विजयलक्ष्मी यांच्यासोबत हैदराबादहून बेंगळुरूला पोहोचल्या. त्यांना येलाहंका पॅलेस येथे जायचे होते. मात्र, विमानतळावरच पोलिसांनी त्यांचा मार्ग अडवला. या ठिकाणी जगन मोहन रेड्डी यांचे कुटुंब वास्तव्यास आहे.

पोलिसांनी रोखल्यानंतर शर्मिला यांनी संताप व्यक्त केला. "हे आमचे कौटुंबिक घर आहे. आमची कौटुंबिक मालमत्ता आहे. आम्हाला आमच्याच घरात जायचे असेल, तर त्यात चुकीचे काय आहे? मग आम्हाला का रोखले जात आहे?" असा सवाल त्यांनी केला.

दरम्यान, येलाहंका येथील मालमत्तेच्या व्यवस्थापकांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना स्थानिक न्यायालयाने शर्मिला, त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि त्यांच्या वतीने येणाऱ्या इतर व्यक्तींना संबंधित मालमत्तेत प्रवेश करण्यास मनाई करणारा अंतरिम आदेश दिला आहे. याच आदेशाचा आधार घेत पोलिसांनी त्यांना घरात जाण्यापासून रोखल्याचे समोर आले आहे.

तर न्यायालयाच्या आदेशावर प्रश्न उपस्थित करत शर्मिला यांनी आपल्याला या प्रकरणाची कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले. "मी या प्रकरणात पक्षकार नाही. मला माहीतही नसलेल्या व्यक्तींनी ही याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्त्यांचा येलाहंका हाऊसशी काय संबंध आहे, हेही मला माहीत नाही," असे त्या म्हणाल्या.

दरम्यान, या मालमत्तेवरून दोघांमधील वाद गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. जगन मोहन रेड्डी यांच्या मते, ही मालमत्ता त्यांच्या मालकीची असून त्यांच्या सासूच्या नावावर नोंदणीकृत आहे. मात्र, शर्मिला यांनी ही वायएसआर कुटुंबाची वडिलोपार्जित मालमत्ता असल्याचा दावा केला आहे. या घरात राहण्याचा आणि मालमत्तेतील आपला हिस्सा मागण्याचा अधिकार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

विशेष म्हणजे, शर्मिला यांनी मुलगी अंजलीच्या लग्नासाठी आणि स्वागत समारंभासाठी येलाहंका हाऊस वापरण्याची परवानगी जगन यांच्याकडे मागितली होती. मात्र, सुरक्षितता आणि खासगीपणाचे कारण पुढे करत जगन यांनी ही मागणी फेटाळली. शिवाय स्वतःच्या मुलींच्या लग्नासाठी किंवा स्वागत समारंभासाठीही या मालमत्तेचा वापर करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT