Jammu and Kashmir : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करताच राजकीय उलथापालथ सुरू झाली आहे. खरेतर त्याआधीपासून डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पक्षाचे संस्थापक गुलाम नबी आझाद हे आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करणार असल्याची जोरदार चर्चा होती.
आझाद आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये संवाद सुरू असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. त्यावर आझाद यांच्या पक्षाकडून खुलासा करण्यात आला आहे. अशी कोणतीही चर्चा झाली नसून ही अफवा असल्याचे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
पक्षाचे मुख्य प्रवक्ते सलमान निझामी यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात याबाबत खुलासा केला आहे. काँग्रेसकडून मागील दोन आठवड्यांपासून या अफवा पसरवल्या जात आहेत. काँग्रेसमधून बाहेर पडल्यापासून आझाद यांनी कधीही काँग्रेस नेत्यांशी किंवा काँग्रेस यांच्याकडून आझाद यांच्याशी प्रत्यक्ष भेटून किंवा फोनद्वारे संपर्क करण्यात आलेला नाही, असे निझामी यांनी म्हटले आहे.
आमचा पक्ष फोडण्यासाठी आणि संभ्रम निर्माण करण्यासाठी या अफवा पसरवल्या जात असल्याचा आरोप निझामी यांनी केला आहे. या जाळ्यात अडकू नका, असे आवाहन आझाद यांनी पक्षाचे सर्व नेते व कार्यकर्त्यांना केले आहे.
दरम्यान, आझाद यांनी सप्टेंबर 2022 मध्ये पक्षाची स्थापना केली आहे. विधानसभेची निवडणूक लढण्याची घोषणाही त्यांनी केली आहे. सध्यातरी ते कोणत्याही पक्षासोबत आघाडी करणार नसल्याचे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. आझाद हे जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री असल्याने त्यांचा पक्ष या निवडणुकीत किती प्रभाव पाडणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
आझाद हे काँग्रेससोबत जाणार नसले तरी त्यांच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री ताज मोहिउद्दीन यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. ते काँग्रेसमध्ये परत जाणार असल्याचे समजते. काँग्रेसचे जम्मू-काश्मीरचे प्रदेशाध्यक्ष तारिक कर्रा हे दिल्लाहून आल्यानंतर मोहउद्दीन यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश होऊ शकतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.