Amit Shaha News : लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्याच्या धक्क्यातून सावरण्यासाठी आणि पक्षाच्या नवीन अध्यक्षाची निवड करण्यासाठी भारतीय जनता पक्ष 1 सप्टेंबरपासून देशव्यापी सदस्यत्व मोहीमेचा पहिला टप्पा सुरू करणार आहे.
या मोहीमेअंतर्गत दहा कोटी नवीन सदस्य पक्षाशी जोडण्याचे लक्ष्य भाजपने (BJP) ठेवलं आहे. पक्षाचे राष्ट्रीय पदाधिकारी, प्रदेशाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मोहिमेची रूपरेषा ठरविण्यात आली आहे. सरचिटणीस विनोद तावडे यांच्याकडे अभियानाचे राष्ट्रीय समन्वयकाची जबाबदारी देण्यात आली आहे.
या मोहिमेचा पहिला टप्पा 1 ते 25 सप्टेंबर दरम्यान सुरू होणार आहे. तर दुसरा टप्पा ऑक्टोबरमध्ये सुरू होईल. हरियाणा, जम्मू आणि काश्मीर, झारखंड आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर भाजप (BJP) सदस्यत्व मोहीम सुरू करणार आहे.
2014 ते 2019 पर्यंत या काळातील सदस्यत्व मोहिमे दरम्यान भाजपने 18 कोटी सदस्य पक्षाशी जोडले होते. त्यावेळी भाजपला जगातील सर्वात मोठ्या पक्षाचा दर्जा मिळाला होता. तर आताच्या मोहिमेत मिस्ड कॉल, क्यूआर कोड, नमो ॲप आणि पक्षाच्या वेबसाइटद्वारे सदस्यत्व देण्यात येणार आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी दोन-तीन राज्य जोडून सदस्यत्व प्रभारी नियुक्त करण्यात येणार आहेत.
दरम्यान, या मोहिमेसंदर्भात बोलताना भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा (Amit Shaha) यांनी पुढील 35 वर्षे देशाच्या राजकारणात भाजपचा झेंडा असाच फडकत राहील, असा विश्वास व्यक्त केला. तसंच भाजप हा सर्वसमावेशक पक्ष असून पक्षाची मुळे खूप खोल आहेत. आम्ही आधीच जगातील सर्वात मोठा पक्ष आहोत. त्यामुळे आम्ही ठरवलं असतं तर नवीन सदस्यत्व मोहीम नव्याने सुरू केलीच नसती.
मात्र, आमचा पक्ष लोकशाही पक्ष आहे, त्यामुळे आम्ही ही मोहिम हाती घेतली असल्याचं ते म्हणाले. तर काही राज्यांमध्ये अपेक्षित निकाल लागले नाहीत हे खरे आहे. मात्र, दुसरीकडे आम्ही ओडिशात सरकार स्थापन करण्यात यशस्वी झालो असून आमची ईशान्येत ताकद वाढल्याचंही शहा म्हणाले.
सदस्यत्व मोहिमेचे राष्ट्रीय समन्वयक ही जबाबदारी असतानाच विनोद तावडे यांच्याकडे राजस्थान, मध्य प्रदेश, गोवा, दमण दीव आणि दादरा नगर हवेलीचा कार्यभार सोपवण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.