HD Deve Gowda and Suraj Revanna

 

Sarkarnama

देश

माजी पंतप्रधान देवेगौडांची अब्रू अखेर नातवानेच वाचवली

विधान परिषदेच्या निवडणुकीत धर्मनिरपेक्ष जनता दलाला सर्वाधिक फटका बसला आहे.

सरकारनामा ब्युरो

बंगळूर : कर्नाटकात स्थानिक स्वराज्यसंस्था मतदारसंघातील विधान परिषदेच्या निवडणुकीत (Legislative Council Election) भाजप (BJP) हा 12 जागा मिळवून सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. काँग्रेस (Congress) 11 जागांसह दुसऱ्या स्थानी तर धर्मनिरपेक्ष जनता दलाला (JDS) केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. मात्र, या निवडणुकीत सर्वाधिक फटका जेडीएसला बसला आहे. माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा (H.D.Deve Gowda) यांचे नातू सूरज रेवण्णा (Suraj Revanna) हे पक्षाचे एकमेव विजयी उमेदवार ठरले आहेत.

देवेगौडांचा बालेकिल्ला असलेल्या हसनमधून सूरज रेवण्णा हे विजयी झाले. जेडीएसने मागील वेळी 4 जागा मिळवल्या होत्या. या निवडणुकीत जेडीएसने 6 उमेदवार रिंगणात उतरवले होते. यात केवळ हसनची एकच जागा पक्षाला मिळाली आहे. सूरज यांच्यामुळे पक्षाची आणि त्यांचे काका माजी मुख्यमंत्री एच.डी.कुमारस्वामी यांची मोठी नामुष्की टळली आहे. सूरज यांना 2 हजार 281 मते मिळाली. त्याचवेळी काँग्रेसचे उमेदवार एम. शंकर यांना 748 आणि भाजपचे एच.एम.विश्वनाथ यांना 421 मते मिळाली तर 103 मते अवैध ठरली. मागील वेळी जेडीएसने तुमकूर, कोलार, मंड्या आणि म्हैसूरमधून विजय मिळवला होता.

कर्नाटकात स्थानिक स्वराजसंस्था मतदारसंघाच्या निवडणुका 10 डिसेंबरला झाल्या. या निवडणुका 25 जागांसाठी झाल्या. काँग्रेसचे विद्यमान 14 आमदार, भाजपचे 7 तर जेडीएसचे 4 आमदार यांचा कार्यकाळ पुढील वर्षी 5 जानेवारीला संपत असल्याने या निवडणुका झाल्या. यात भाजपला 12, काँग्रेसला 11, जेडीएसला 1 आणि इतरांना 1 अशा जागा मिळाल्या. या निवडणुकीनंतर विधान परिषदेत बहुमत मिळेल, असा भाजपला कयास होता. परंतु, केवळ एका जागेमुळे भाजपला बहुमताचा आकडा गाठला आला नाही.

भाजपचे मुख्य प्रतोद महंतेश कवटगीमठ यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे. ते विद्यमान आमदार होते आणि बेळगावमधून रिंगणात उतरले होते. त्यांच्यासोर काँग्रेसचे चन्नराज हट्टीहोळी आणि अपक्ष उमेदवार लखन जारकीहोळी यांचे आव्हान होते. येथून हट्टीहोळी आणि जारकीहोळी हे विजयी झाले. दुसऱ्या पसंतीच्या मतात जारकीहोळींनी कवटगीमठ यांच्यावर बाजी मारली. विशेष म्हणजे भाजपचे आमदार रमेश जारकीहोळी यांचे ते बंधू आहेत. त्यांनी उघडपणे आपल्या भावाला पाठिंबा दिला होता. भाजपच्या आमदारामुळेच मुख्य प्रतोदांचा पराभव झाल्याने पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT