Narendra Modi Sarkarnama
देश

BJP Politics : मोदी ज्यासाठी काँग्रेसवर बरसले, भाजपने काही तासांत तेच केले! जाहीरनाम्यात अनेक मोठ्या घोषणा...

Jharkhand Assembly Election Narendra Modi Amit Shah BJP Manifesto : झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने रविवारी जाहीरनामा प्रसिध्द केला.

Rajanand More

Ranchi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन दिवसांपूर्वी हिमाचल प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकमधील काँग्रेस सरकारच्या विविध योजनांवरून जोरदार निशाणा साधला होता. मोफतच्या योजनांमुळे तिन्ही राज्यांची स्थिती बिकट बनल्याचे सांगत ते काँग्रेसवर बरसले होते. पण त्यानंतर काही तासांतच भाजपने तेच केले आहे.

झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत जाहीरनामा प्रसिध्द केला. या जाहीरनाम्यामध्ये अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातील लाडकीय बहीण योजनेप्रमाणेच गोगो दीदी योजनेची घोषणा करण्यात आली असून त्याअंतर्गत महिलांना दर महिन्याला 2100 रुपये दिले जाणार आहे.

दिवाळी व रक्षाबंधनला मोफत गॅस सिलिंडर, युवकांना करिअरसाठी मदत म्हणून दोन वर्षे दर महिन्याला दोन हजार रुपये प्रोत्साहन भत्ता, मोफत वाळू आणि नळ कनेक्शन, बीएड, नर्सिंग आणि अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांचे सरकारी संस्थांमध्ये मोफत शिक्षण, खासगी संस्थांमध्ये शिक्षण शुल्क माफ, वृध्द, विधवा आणि दिव्यांगांना दरमहा 2500 रुपये पेन्शन आदी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी मागील आठवड्यात कर्नाटकातील आपल्याच सरकारचे मोफत योजनांवर कान उपटले होते. आर्थिक स्थिती पाहून अशा योजना लागू करायला हव्यात, असे ते म्हणाले होते. त्यावरून मोदींनी पलटवार करत काँग्रेसचा बुरखा फाटल्याची टीका केली होती. काँग्रेसने राज्यात सुरू केलेली महिलांना मोफत बस प्रवास योजना बंद केली जाणार असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, झारखंडसाठी भाजपने प्रसिध्द केलेल्या जाहीरनाम्यात इतरही काही महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. राज्यातील सरकारी कार्यांमध्ये 2.87 लाख भरती केली जाणार असून 5 लाख स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून जातील. 21 लाख कुटुंबांना पक्के घर देण्याचे आश्वासनही भाजपने दिले आहे. घुसखोरी रोखणे तसेच त्यांच्या ताब्यातील जमीन स्थानिकांना परत करण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे.

यूसीसी कायदा राज्यातील आदिवासींना लागू होणार नाही, दोन वर्षांत नक्षलवाद संपुष्टात आणला जाईल, अशी मोठी घोषणाही भाजपने केली आहे. गरीब आणि मागासवर्गातील मुलींना केजी ते पीजीपर्यंत मोफत शिक्षण, मातृत्व सुरक्षा योजनेअंतर्गत प्रत्येक गर्भवती महिलेला सहा पोषण किट आणि 21 हजार रुपये मदत देण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात देण्यात आले आहे.     

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT