Kalpana Soren Sarkarnama
देश

Kalpana Soren : महाराष्ट्रातील 'तो' निकाल कल्पना सोरेन यांची वाट रोखणार? मुख्यमंत्रिपद मिळण्यातील मोठा अडथळा

Rajanand More

Jharkhand News : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना या मुख्यमंत्री होऊ शकतात, अशी जोरदार चर्चा आहे. सक्तवसुली संचालनालयाने हेमंत सोरेन यांच्याभोवती चौकशीचा फास आवळल्याने त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. त्यामुळे कल्पना यांच्याकडे मुख्यमंत्रिपद येऊ शकते, असा अंदाज आहे. पण कल्पना यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या मार्गात उच्च न्यायालयाचे दोन निकाल मोठा अडथळा ठरू शकतात.

झारखंड मुक्ती मोर्चाचे (JMM) आमदार सर्फराज अहमद यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे कल्पना सोरेन अचानक चर्चेत आल्या आहेत. त्या सध्या विधानसभेच्या सदस्या नाहीत. त्यामुळे हेमंत सोरेन (Hemant Soren) यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यास ही जागा घेण्यासाठी कल्पना सोरेन यांना विधानसभेत (Assembly) जाणे आवश्यक आहे. त्यासाठी पोटनिवडणूक हा एकमेव पर्याय आहे.

काटोल पोटनिवडणूक ठरेल अडथळा

नागपुरातील काटोल (Katol) विधानसभा मतदारसंघाचे तत्कालीन आमदार आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी ऑक्टोबर 2018 मध्ये आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीबरोबर (LokSabha Election) पोटनिवडणूक घेण्याचा निर्णय घेतला. त्यावर आक्षेप घेणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली. ही निवडणूक घेतल्यास नव्या आमदारांना प्रत्यक्ष काम करण्यासाठी केवळ दोन-तीन महिन्यांचाच कालावधी मिळणार आहे. त्यामुळे निवडणुकीला स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली होती. उच्च न्यायालयाने ही मागणी ग्राह्य धरत निवडणूक स्थगित केली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

झारखंडमध्येही विधानसभा निवडणुकीसाठी जेमतेम एक वर्षाचा कालावधी उरला आहे, तर मार्च-एप्रिल महिन्यात लोकसभेच्या निवडणुका आहेतच. निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केल्यास काटोल मतदारसंघाबाबतच्या उच्च न्यायालयाच्या निकालाचा आधार घेऊन कोणी न्यायालयात गेल्यास अडचण येऊ शकते. त्यामुळे हा निकाल कल्पना (Kalpana Soren) यांच्या मार्गातील मोठा अडथळा असल्याचे मानले जात आहे.

हा आहे दुसरा अडथळा...

हेमंत सोरेन हे बरहेट विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. हा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आहे. कल्पना या ओडिशातील असून आदिवासी नाहीत. त्यामुळे पतीच्या मतदारसंघातून त्या निवडणूक लढवू शकत नाहीत. झारखंडमध्ये दुसऱ्या राज्यातून आलेल्या व्यक्तींना आरक्षणाचा लाभ मिळत नाही. नुकत्याच एका प्रकरणातही उच्च न्यायालयाने याबाबतचा निकाल दिला आहे.

कल्पना सोरेन या मुख्यमंत्री झाल्यास त्यांना सहा महिन्यांच्या आत आमदारकी मिळवावी लागणार आहे. पण त्या पतीच्या जागेवरून निवडणूक लढवू शकणार नाहीत. त्यासाठीच सर्फराज यांना राजीनामा द्यावा लागला आहे. त्यांचा गांडेय हा मतदारसंघ खुला असून तो पक्षाचा बालेकिल्ला आहे. तिथून त्या सहजपणे जिंकू शकतात. सलग पाच वेळा या मतदारसंघावर जेएमएमचे वर्चस्व राहिले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT