Bandhu Tirkey
Bandhu Tirkey Sarkarnama
देश

सहा लाखांसाठी काँग्रेस नेत्याला आमदारकीवर सोडावं लागलं पाणी

सरकारनामा ब्युरो

रांची : झारखंड काँग्रेसचे (Congress) नेते बंधू तिर्की (Bandhu Tirkey) यांना सीबीआय (CBI) न्यायालयाने बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात तीन वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर आता त्यांना आमदारकीवरही (MLA) पाणी सोडावे लागले आहे. त्यांचं विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे. कायद्यानुसार दोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाल्यानंतर सदस्यत्व रद्द होतं. त्यानुसार तिर्की यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.

तिर्की हे माजी मंत्री असून तीनवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. सध्या ते मांडर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. पण आता त्यांचे सदस्यत्व रद्द झाल्याने या मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. दरम्यान, तिर्की यांच्यावर उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती जमवल्याच्या प्रकरणात सीबीआयच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश पी. के. शर्मा यांनी दहा दिवसांपूर्वीच ही शिक्षा सुनावली आहे. उत्पन्नापेक्षा सहा लाखांची बेहिशेबी संपत्ती आढळून आल्याने तिर्की यांना दोषी धरण्यात आले होते. त्यांनी तीन लाखांचा दंड न भरल्यास आणखी सहा महिने तुरूंगात राहावे लागेल.

काय आहे प्रकरण?

बंधू तिर्की यांच्यावर सहा लाख 28 हजार 698 रुपयांची बेहिशेबी संपत्ती बाळगल्याचा आरोप होता. या प्रकरणात सीबीआयने त्यांना 12 डिसेंबर 2018 रोजी अटक केली होती. सुमारे 40 दिवस ते तुरूंगात होते. त्यानंतर उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. सीबीआयने तिर्की यांच्या कोडा घोटाळ्याप्रकरणी 11 ऑगस्ट 2010 मध्ये प्राथमिक गुन्हा दाखल केला होता.तर 16 जानेवारी 2019 रोजी आरोप निश्चित करण्यात आले होते.

सोमवारी तिर्की यांना शिक्षा सुनावली. तिर्की यांनी मार्च 2005 ते जून 2009 या कालावधीत आमदार असताना उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती जमा केली होती, असा आरोप सीबीआयने केला होता. या प्रकरणात सीबीआयने 21 साक्षीदार तर बचाव पक्षाकडून आठ साक्षीदार होते. डिसेंबर 2019 मध्ये या प्रकरणाची सुनावणी सुरू झाल्यानंतर तिर्की यांनी त्यांची बाजू मांडली होती. कोरोनामुळे सुनावणी लांबली होती.

तिर्की हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना शिक्षा झाल्याने तसेच आमदारकीही गेल्याने झारखंड काँग्रेसला धक्का बसला आहे. तीन वेळा आमदार आणि माजी मंत्री असलेल्या तिर्की यांच्यावर नामुष्की ओढावली आहे. झारखंडमध्ये (Jharkhand) काँग्रेस पक्ष झारखंड मुक्ती मोर्चासोबत सत्तेत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT