भाजपचा विधान परिषदेतही दबदबा; सात जागांवर उमेदवारांचा विजय

भाजपने लढवलेल्या एकूण 12 जागांपैकी सात जागांवर विजय मिळाला आहे. तर एनडीएला 24 पैकी एकूण 13 जागा मिळाल्या आहेत.
BJP Flags
BJP Flags Sarkarnama

पाटणा : बिहारमधील (Bihar) विधान परिषद निवडणुकीचे (Election) चित्र स्पष्ट झालं असून भाजपने (BJP) विधानसभा निवडणुकीप्रमाणेच विधान परिषदेतही आपला दबदबा कायम ठेवला आहे. भाजपने लढवलेल्या एकूण 12 जागांपैकी सात जागांवर विजय मिळाला आहे. तर एनडीएला (NDA) 24 पैकी एकूण 13 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकीतही भाजप मोठा भाऊ ठरला आहे.

विधान परिषदेच्या 24 जागांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी गुरूवारी झाली. रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरू होती. या निवडणुकीत एनडीएने 13 जागा जिंकत राष्ट्रीय जनता दल (RJD) आणि मित्रपक्षांचा पराभव केला आहे. भाजपने 12 जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यापैकी सात जागांवर त्यांचा विजय झाला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्या संयुक्त जनता दलाला (JDU) 11 जागा मिळाल्या होत्या. त्यापैकी पाच जागांवरच यश मिळाले आहे. एनडीएमध्ये एक जागा केंद्रीय मंत्री पशुपती पारस यांच्या पक्षाला मिळाली आहे.

2020 मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने जेडीयूपेक्षा चांगली कामगिरी केली होती. त्यावेळी भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत होता. पण निवडणुकीआधी नितीश कुमार यांनाच मुख्यमंत्री करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे जास्त जागा मिळवूनही भाजपने आपल्या शब्द पाळत नितीश कुमार यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ टाकली. आता विधान परिषदेतही भाजपच मोठा भाऊ ठरल्याने आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीत भाजपचं पारडं जड झालं आहे.

तेजस्वी यादव यांच्या जागा वाढल्या

जेडीयूच्या तुलनेत तेजस्वी यादव (Tejaswi Yadav) यांच्या आरजेडीची कामगिरी चांगली राहिली आहे. विधानसभा निवडणुकीतही हेच चित्र होते. यादव यांना नितीश कुमार यांच्यापेक्षा दोन जागा जास्त मिळाल्या आहेत. मागील निवडणुकीत आरजेडीला केवळ चार जागा मिळाल्या होत्या. आता हा आकडा सहावर गेला आहे. यादव यांच्यासोबत माक्सर्वादी कम्युनिस्ट पक्षाची आघाडी होती. या आघाडीने 23 उमेदवार रिंगणात उतरवले होते. पण केवळ सहा जागांवर समाधान मानावे लागले.

काँग्रेसला एक जागा राखली

विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसने (Congress) आघाडीसाठी आरजेडीकडे हात पुढे केले होते. पण तेजस्वी यादव यांनी त्यास नकार दिला. पण त्यानंतर काँग्रेसने या निवडणुकीत उतरत आपली एक जागा कायम राखली आहे. काँग्रेसने 15 जागांवर उमेदवार उतरवले होते. त्यापैकी केवळ एका जागेवर विजय मिळाला. मागील निवडणुकीतही काँग्रेसला एकच जागा मिळाली होती. तसेच काँग्रेसने मोतीहारी जागेवरील अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला होता. या उमेदवाराचाही विजय झाला आहे.

अपक्षांनीही दाखवली ताकद

बिहारमधील विधान परिषदेच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवारांनी आपली ताकद दाखवून दिली. जवळपास सात जागांवर अटीतटीची लढत झाली. त्यापैकी चार ठिकाणी अपक्ष उमेदवारांचा विजय झाला असून इतर जागांवर ते दुसऱ्या स्थानावर राहिले आहेत. सारण, चंपारण, नवादा आणि मधुबनी या जागांवर अपक्ष विजयी झाले आहेत. तर इतर तीन ठिकाणी त्यांनी भाजप, जेडीयू, आरजेडी किंवा काँग्रेसला तिसऱ्या स्थानावर ढकललं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com