Champai Soren Sarkarnama
देश

Champai Soren : ऑपरेशन लोटस फेल? दिल्लीतून परतलेल्या चंपई सोरेन यांची नवी इनिंग...

Rajanand More

Ranchi : झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन भाजपमध्ये जाणार असल्याच्या जोरदार चर्चा मागील तीन दिवसांपासून सुरू होत्या. पण ते दिल्लीतून रिकाम्या हाताने परतल्याचे संकेत मिळत आहेत. सुरूवातीला त्यांना पाठिंबा दिलेल्या आमदारांनीही माघार घेत मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या गोटात गेल्याचे समजते.

चंपई सोरेन दोन दिवसांपूर्वी दिल्लीला गेले होते. मंगळवारी रात्री ते झारखंडमध्ये परतले. समर्थकांकडून त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यानंतर बुधवार सकाळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.  

चंपई सोरेन यांनी दोन दिवसांपूर्वी ‘एक्स’वर पोस्ट करत आपल्यासमोर तीन पर्याय असल्याचे म्हटले होते. राजकारणातून संन्यास, स्वतंत्र संघटना किंवा इतर पक्षात प्रवेश करणे, असे तीन पर्याय होते. या पोस्टमध्ये त्यांनी अप्रत्यक्षपणे हेमंत सोरेन यांना लक्ष्य केले होते. या भावनांवर आपण कायम असल्याचे सांगताना चंपई सोरेन यांनी राजकारणातून संन्यास घेणार नसल्याचेही सांगितले.

पुढील काही दिवसांत राज्यात विधानसभेची निवडणूक आहे. त्यासाठी भाजप आणि इंडिया आघाडीतून जोरदार तयारी सुरू आहे. अशा स्थितीत चंपई सोरेन यांच्यासारखा नेता इंडिया आघाडीला सोडून चालला आहे. पण भाजप नेत्यांमध्येही त्यांच्या पक्षप्रवेशाबाबत फारसा उत्साह नसल्याचे दिसून आले. तसेच त्यांना पाठिंबा दिलेल्या सुमारे चार आमदारांनीही काढता पाय घेतल्याचे समजते. त्यामुळे चंपई सोरेन यांनी निवडणुकीच्या तोंडावर स्वतंत्र पक्ष स्थापन करून निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

अजूनही आपल्यासमोर पर्याय खुले असल्याचे सांगताना चंपई सोरेन यांनी पक्ष स्थापन केला तरी इतर पक्षांसोबत आघाडी करण्याचे संकेतही दिले आहेत. त्यामुळे स्वतंत्र पक्ष स्थापन करून भाजपसोबत आघाडीचा करण्याचा पर्यायही ते निवडू शकतात. पण सध्यातरी भाजप प्रवेशाचे ऑपरेशन लोटस फेल ठरल्याचेच दिसत आहे.

सोरेन हे अजूनही झारखंड सरकारमध्ये जलसंधारण मंत्री आहेत. त्यांनी ना मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे, ना पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. सोशल मीडियातून पक्षाचा उल्लेख काढला असला तरी त्यांनी पक्षातील कोणत्याही पदांचा राजीनामा दिलेला नाही. पक्षाचे प्रमुख शिबू सोरेन यांना ते गुरू मानतात. त्यामुळे ते शिबू सोरेन यांची भेट घेऊनही पुढील निर्णय घेतील, अशीही शक्यता व्यक्त केलली जात आहे.   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT