Nitish Kumar, Saryu Rai Sarkarnama
देश

Nitish Kumar : नितीशबाबूंचा मास्टर स्ट्रोक; भाजपला धक्का देणाऱ्या ‘जायंट किलर’ला आणलं पक्षात

Jharkhand Politics Saryu Rai JDU : सरयू राय यांनी 2019 मध्ये माजी मुख्यमंत्री रघुबर दास यांच्याविरोधात निवडणूक लढवत त्यांचा पराभव केला होता.

Rajanand More

New Delhi : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपला मोठा धक्का दिला आहे. 2019 च्या विधानसभा निवडणूक झारखंडमध्ये भाजपला झटका दिलेले आमदार सरयू दास यांनी नितीशबाबूंच्या संयुक्त जनता दलामध्ये रविवारी प्रवेश केला. भाजपचे नेते व माजी मुख्यमंत्री रघुबर दास यांचा पराभव करत राय जायंट किलर ठरले होते.

झारखंडमध्ये यावर्षी विधानसभेची निवडणूक होत आहे. त्यामुळे सरयू राय यांच्या प्रवेशाने जेडीयूसह एनडीएचीही ताकद वाढणार आहे. पण राय हे भाजपमधील माजी नेते असल्याने राज्यात दोन्ही पक्षांतील नेत्यांमध्ये संवाद होणार का, याबाबतही साशंकता व्यक्त केली जात आहे.

राय यांनी रविवारी दिल्लीत जेडीयूमध्ये प्रवेश केला. त्यांनी काही दिवसांपूर्वी नितीश कुमार यांची भेट घेतली होती. 2019 मध्ये भाजपमधून बाहेर पडल्यानंतरत्यांनी भारतीय जनतंत्र मोर्चाची स्थापना केली होती. आगामी विधानसभा निवडणुकीत जेडीयूसोबत आघाडी करण्याचे त्यांचे प्रयत्न सुरु होते. याबाबत त्यांनीच स्पष्टीकरण दिले होते. पण आघाडीच्या चर्चा सुरू असतानाच राय यांना थेट पक्षात आणत नितीश कुमार यांनी भाजपला धक्का दिल्याचे मानले जात आहे.

तत्कालीन भाजप सरकारमध्ये राय मंत्री होते. पण दास यांच्यासोबत बिनसल्याने ते त्यावेळी नाराज होते. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोपही झाले होते. निवडणुकीवेळी तिकीट वाटपात त्यांचा पत्ता कट करण्यात आला. त्यामुळे त्यांनी थेट दास यांच्याविरोधात मोहिम उघडली.

दास यांच्याच मतदारसंघातून राय यांनी अपक्ष निवडणूक लढवली आणि जिंकलीही. या निवडणुकीत भाजपची सत्ताही गेली होती. राय यांच्या उमेदवारीचा इतर मतदारसंघातही परिणाम झाल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती. आता जेडीयूसोबत राहून ते हेमंत सोरेन यांच्या झारखंड मुक्ती मोर्चाची सत्ता घालवणार की भाजपचीच डोकेदुखी वाढवणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT