Manmohan Singh File Photo
देश

जिवंत असलेले माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना क्रीडामंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत दाखल करण्यात आले आहे.

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग (Manmohan Singh) यांना भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (AIIMS) दाखल करण्यात आले आहे. डॉ. सिंग यांना डेंगीची लागण झाली असून, त्यांची प्रकृती सुधारत आहे, अशी माहिती एम्सने दिली आहे. असे असतानाही झारखंडच्या (Jharkhand) क्रीडामंत्र्यांनी जिवंत असलेल्या डॉ.सिंग यांना श्रद्धांजली वाहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

झारखंडचे क्रीडामंत्री हफिझुल हसन (Hafizul Hassan) यांनी हा प्रकार केला आहे. सोशल मीडियावर डॉ.सिंग यांचे निधन झाल्याच्या अफवा पसरल्या होत्या. या अफवा खऱ्या मानून हसन यांनी डॉ.सिंग यांच्या श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित केला. डॉ.सिंग यांचे निधन झाले आहे असे मानून त्यांना काही मिनिटे मौन पाळून श्रद्धांजलीही वाहिली. नंतर या कार्यक्रमाचे वृत्त सगळीकडे पसरले. डॉ.सिंग हे जिवंत असल्याचे कळाल्यानंतर मंत्र्यांना धक्का बसला. त्यांनी माफी मागून या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. यानंतर मंत्री हसन यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, सोशल मीडियावरील चुकीच्या बातम्यांमुळे माझ्याकडून चूक झाली. माझ्या श्रद्धांजलीपर कार्यक्रमाबद्दल मी मनापासून माफी मागतो. डॉ.सिंग यांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी, अशी प्रार्थना मी करतो.

डॉ.मनमोहनसिंग यांना डेंगीची लागण झाली आहे. त्यांची प्रकृती सुधारत आहे. त्यांचा प्लेटलेट काऊंटही वाढत आहे, अशी माहिती एम्सच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. डॉ.सिंग यांना ताप आणि अशक्तपणा जाणवत होता. त्यामुळे त्यांना 13 ऑक्टोबरला तातडीने एम्समध्ये हलवण्यात आले होते. रुग्णालयातील कार्डिओ-न्युरो सेंटरमधील वॉर्डमध्ये डॉ.सिंग यांच्यावर उपचार सुरू आहेत. हृदयरोगतज्ञ डॉ.नितीश नाईक यांच्या नेतृत्वाखालील पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे.

डॉ.सिंग यांना एम्समध्ये दाखल केल्यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी 14 ऑक्टोबरला रुग्णालयाला भेट दिली होती. त्यांनी डॉ.सिंग यांच्या प्रकृतीची विचारपूस करीत त्यांच्यावरील उपचारांचीही माहिती घेतली होती. त्यांच्या या भेटीवरून मोठा गदारोळ झाला होता. या भेटीचा त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेला फोटोही अखेर डिलिट करावा लागला होता. नंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही एम्समध्ये जाऊन डॉ.सिंग यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT