Jitan Ram Manjhi
Jitan Ram Manjhi Sarkarnama
देश

हजार कोटी रुपये द्या नायतर सरकारमधून पलटी! माजी मुख्यमंत्र्यांची धमकी

सरकारनामा ब्युरो

पाटणा : बिहारमध्ये (Bihar) संयुक्त जनता दल (JDU) आणि भाजपचे (BJP) सरकार आहे. सत्तेत एकत्र असूनही दोन्ही पक्षांत कुरघोड्यांचे राजकारण सुरू आहे. यातच आता मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar) यांना माजी मुख्यमंत्री जितनराम मांझी (Jitan Ram Manjhi) यांनी धमकी दिली आहे. मांझी हे सरकारमध्ये असून, त्यांनी विरोधकांच्या महाआघाडीत जाण्याची धमकी दिली आहे.

जितनराम मांझी यांचा हिंदुस्तान आवाम मोर्चा हा पक्ष राज्यातील सत्तेत सहभागी आहे. त्यांनी आता थेट सरकारमधून बाहेर पडण्याची धमकी दिली आहे. त्यांनी नितीशकुमार यांच्याकडे 1 हजार कोटी रुपयांची मागणी केली आहे. ते म्हणाले की, माझा मुलगा संतोष कुमार यांच्या फंडात 1 हजार कोटी रुपये न टाकल्यास मी महाआघाडीकडे पलटी मारेन. माझ्या मुलालाही मी 1 हजार कोटी रुपयांच्या योजनांचा आराखडा बनवण्यास सांगितला आहे. या पैशातून अनेक योजनांचे पुनरुज्जीवन करण्यात येईल. गया जिल्ह्यात या निधीतून विकासकामे केली जातील. आता मी आयुष्यातील अंतिम खेळी खेळत आहे. त्यामुळे विकासासाठी जे करता येईल ते मी करेन.

मागील काही काळापासून भाजपचे नेते नितीशकुमार यांना सातत्याने लक्ष्य करीत आहेत. याला जेडीयूचे नेतेही उत्तर देऊ लागल्याने सत्ताधारी आघाडीत जुंपल्याचे चित्र अनेक वेळा दिसू लागले आहेत. त्यातच आता मांझींची भर पडली आहे. काही दिवसांपूर्वी नितीशकुमार यांनी भाजपच्या महिला आमदाराबद्दल केलेल्या टिप्पणीमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. याची तक्रार महिला आमदार निक्की हेमब्रम यांनी थेट पक्ष नेतृत्वाकडे केली होती. यामुळे दोन्ही पक्षांतील बेबनाव समोर आला होता.

बिहारच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दल 75 जागा मिळवून सर्वांत मोठा पक्ष ठरला होता. दुसऱ्या क्रमांकावर 74 जागांसह भाजप होता. जेडीयूला 43 जागा मिळाल्या होत्या आणि काँग्रेसला 19 जागा मिळाल्या होत्या. नितीश यांच्या जेडीयूला कमी जागा मिळाल्याने ते पुन्हा मुख्यमंत्री होणार का अशी चर्चा सुरू झाली होती. अखेर भाजपने नितीशकुमार यांचेच नाव पुढे केले होते. आता मात्र, भाजप आणि जेडीयूमधील मतभेद चव्हाट्यावर येऊ लागले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT