Former Judge Madan Lokur’s Serious Allegations Against Government : सुप्रीम कोर्टातील कॉलेजियमकडून होत असलेल्या न्यायमूर्तींच्या बढती प्रक्रियेवरून सध्या वाद निर्माण झालेला असतानाच आता आणखी एक धक्कादायक दावा समोर आले. सुप्रीम कोर्टातील माजी न्यायमूर्तींनी थेट केंद्र सरकारवर मोठा आरोप केला आहे. एका न्यायमूर्तींच्या बदलीसाठी सरकारकडून कॉलेजियमवर सातत्याने दबाव टाकण्यात आल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.
माजी न्यायमूर्ती मदन लोकुर यांनी हा दावा केला आहे. दिल्ली हायकोर्टातील तत्कालीन न्यायमूर्ती एस. मुरलीधर यांची एका निर्णयामुळे बदली करण्यसाठी सरकार दबाव टाकत होते. पण त्याला विरोध करणारे न्यायमूर्ती जोपर्यंत निवृत्त होत नाहीत, तोपर्यंत ही बदली झाली नाही, असेही लोकुर यांनी म्हटले आहे.
न्यायमूर्ती लोकुर यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘पूर्ण न्याय? सुप्रीम कोर्टाची 75 वर्षे’ या पुस्तकामध्ये हा दावा करण्यात आला आहे. ‘लाईव्ह लॉ’ने याबाबतचे वृत्त दिले आहे. त्यानुसार, लोकुर हे कॉलेजियममध्ये असताना सरकारने न्यायमूर्ती मुरलीधर यांच्या बदलीसाठी आग्रह धरला होता. त्याला आपला विरोध होता. त्यामुळे तत्कालीन सरन्यायाधीशही त्याविरोधात गेले.
डिसेंबर 2018 मध्ये आपण निवृत्त झाल्यानंतर पुन्हा एकदा बदलीसाठी दबाव आला. त्यावेळी न्यायमूर्ती ए. के. सिकरी यांनीही त्याला विरोध केला होता. ते मार्च 2019 मध्ये निवृत्त झाल्यानंतर पुन्हा बदलीचा प्रस्ताव आला. अखेरीस फेब्रुवारी 2020 मध्ये न्यायमूर्ती मुरलीधर यांची दिल्ली हायकोर्टातून मनमानी पध्दतीने पंजाब व हरियाणा हायकोर्टात बदली करण्यात आली.
लोकुर यांनी पुस्तकात म्हटले आहे की, सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजियमच्या कामकाजातील पारदर्शकतेवर काही बोलायला हवे. एकदा मला हे स्पष्टपणे जाणवले की कार्यपालिकेकडून (सरकार) न्यायमूर्ती मुरलीधर यांच्या बदलीसाठी सरन्यायाधीशांना सल्ला देण्यात आला होता. त्यांचा एक निर्णय बदलीसाठी आधार होऊ शकत नाही. त्यामुळे मी या प्रस्तावावर असहमती दर्शविली होती. सरन्यायाधीशांनीही ते मान्य केले.
न्यायमूर्ती मुरलीधर यांच्या बदलीनंतर वादही निर्माण झाला होता. दिल्लीत 2020 मध्ये झालेल्या दंगलीदरम्यान भडकाऊ भाषण देण्याचा आरोप असलेल्या राजकीय नेत्यांविरोधात एफआय़आर दाखल न केल्याबद्दल न्यायमूर्ती मुरलीधर यांनी दिल्ली पोलिसांना फटकारले होते. त्यानंतर काही तासांतच त्यांच्या बदलीचा आदेश आला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.