New Delhi News: देशभरात गेल्या काही महिन्यांपासून कथित नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरण प्रचंड गाजत आहे. या वारंवार होत असलेल्या पेपरफुटीविरोधातच कॉक्रोच जनता पार्टीनं दिल्लीतील 'जंतर मंतर'वर पेटवलेल्या आंदोलनानं आता देश व्यापल्याचं दिसून येत आहे. एकीकडे या आंदोलनानं केंद्र सरकार अडचणीत आले असतानाच मोदी-शाह यांचे कट्टर समर्थक राहिलेल्या भाजपच्या माजी नेत्यानं या पेटलेल्या राजकारणात उडी घेतली आहे.
तामिळनाडू भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई यांनी बुधवारी (ता.22) 'नीट' प्रश्नपत्रिका फुटीच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यास झालेल्या विलंबाबद्दल मोदी सरकारवर टीकेची तोफ डागली आहे.त्यांनी आक्रमक भूमिका मांडताना वारंवार प्रश्नपत्रिका फुटूनही "कोणालाही जबाबदार धरले गेले नाही, त्यामुळेच विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरून आपल्या वेदना व्यक्त कराव्या लागल्याची खंत बोलून दाखवली.
भाजप तामिळनाडूचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई यांनी सोशल मीडियावरील 'एक्स' (X) वर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ते म्हणतात, "लोकशाहीत आंदोलन करणे हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे. मात्र, महत्त्वाचा प्रश्न असा आहे की, भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने आंदोलक विद्यार्थ्यांशी संवाद सुरू करण्यासाठी इतका वेळ का घेतला? आंदोलन तीव्र स्वरूप धारण करेपर्यंत अर्थपूर्ण चर्चा का झाली नाही? सरकार नेमके कशाची वाट पाहत होते?" असा संतप्त सवालही अन्नामलाई यांनी उपस्थित केला आहे.
भाजपचे माजी नेते के. अन्नामलाई यांनी बुधवारी (२२ जुलै २०२६) केंद्रातील भाजप-नेतृत्वाखालील सरकारला 'नीट' (NEET) परीक्षेबाबत निर्माण झालेल्या वादावर अर्थपूर्ण संवाद साधण्याचे, पारदर्शकता राखण्याचे आणि विद्यार्थ्यांच्या चिंतेवर तातडीने तसेच योग्य ती कारवाई करण्याचे आवाहन केले.
अन्नामलाई म्हणाले, त्यांनी नेहमीच 'नीट' परीक्षेला पाठिंबा दिला आहे. त्यांच्या मते, देशभरातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत एकसमानता आणण्याचे काम या परीक्षेने केले आहे. तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांनाही वैद्यकीय शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्याची संधीही नीट परीक्षेमुळे उपलब्ध झाली आहे. मात्र, वारंवार होणाऱ्या प्रश्नपत्रिका फुटीमुळे परीक्षेची विश्वासार्हता धोक्यात आल्याचा हल्लाबोल त्यांनी केला आहे.
अन्नामलाई यांनी गेल्या पाच वर्षांत नीट-यूजीची प्रश्नपत्रिका तीनवेळा फुटल्याचा मुद्दा मांडला. त्यामुळे विद्यार्थ्यांना वारंवार परीक्षा द्यावी लागली, कारण "एकसमान आणि विश्वासार्ह व्यवस्था उभारण्यासाठी तयार करण्यात आलेली प्रणालीच अपयशी ठरत होती, असंही ते म्हणाले.
या सर्व प्रकारात कोणालाही जबाबदार धरण्यात आले नाही. याच क्षणी विद्यार्थ्यांच्या मनात संताप निर्माण झाला आणि त्यांना रस्त्यावर उतरून आपल्या भावना व्यक्त कराव्याशा वाटल्या, असेही त्यांनी म्हटले.
भाजपचे माजी नेते अन्नामलाई यांनी यावेळी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनाही आंदोलन मूळ मागण्यांपुरतेच मर्यादित ठेवण्याचं आवाहन केलं. त्यांच्या मते, दीर्घकाळ चालणाऱ्या आंदोलनांमध्ये अनेकदा स्वार्थी हितसंबंध असलेले लोक सहभागी होतात आणि आंदोलनाचा वापर स्वतःचा अजेंडा पुढे नेण्यासाठी करण्याचा प्रयत्न करतात. "अशा लोकांना जर तुम्ही गप्प राहून संधी दिली, तर आंदोलन मूळ उद्दिष्टांपासून भरकटेल. कृपया असं होऊ देऊ नका,असा इशाराही अन्नामलाई यांनी बोलून दाखवला.
यावेळी त्यांनी "कोणत्याही राष्ट्राची खरी ताकद ही त्या देशातील युवकांचा आपल्या संस्थांवरील विश्वास असल्याचं म्हटलं. पण जर विद्यार्थ्यांचा आपल्या शिक्षण व्यवस्थेच्या निष्पक्षतेवर आणि विश्वासार्हतेवरचा विश्वासच उडाला, तर आपण देशाच्या भविष्यास धोक्यात घालत असल्याचं आरोपही अन्नामलाई यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.