Madhya Pradesh MLA Kamleshwar Dodiyar during the Birsa Munda Jayanti programme in Sailana, Ratlam, where his resignation remark went viral. 
देश

MLA viral video : आमदाराने भरसभेत विचारलं 'राजीनामा देऊ का?' समर्थकांनी जागेवरच कंडका पाडला, उत्तर ऐकून नेत्याची फजिती : VIDEO व्हायरल

MLA Resignation Viral Video : बिरसा मुंडा यांच्या मूर्ती अनावरणाच्या कार्यक्रमात आमदारांच्या भाषणाला कार्यक्रमात काही लोकांनी आक्षेप घेतला. हा सामाजिक कार्यक्रम असल्याने येथे राजकीय बोलण्याऐवजी बिरसा मुंडा यांचे विचार आणि आदिवासी समाजाच्या प्रश्नांवर चर्चा करावी, अशी मागणी त्यांनी केली.

Jagdish Patil

Madhya Pradesh News, 17 Nov : मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यातील सैलाना मतदारसंघाचे आमदार कमलेश्वर डोडियार यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. बिरसा मुंडा जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात भाषण करताना त्यांनी उपस्थितांना थेट 'मी राजीनामा देऊ का?' असा सवाल केला. त्यावर समोर बसलेल्या लोकांनी 'देऊन टाका, देऊन टाका' असं उत्तर दिलं. यावर आमदारांनीही 'ठीक आहे, देतो; पण त्यासाठी भोपाळला जावं लागेल,' असं म्हटलं. या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

रतलाम जिल्ह्यातील सैलाना येथे बिरसा मुंडा जयंतीनिमित्त मूर्ती अनावरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात भाषण करताना भारत आदिवासी पार्टीचे आमदार कमलेश्वर डोडियार यांनी स्वतंत्र भील प्रदेशाच्या निर्मितीचा मुद्दा उपस्थित केला. तसेच मध्य प्रदेशात भारत आदिवासी पार्टीचे उमेदवार निवडून आणून राज्यात सत्ता स्थापन करण्याचं आवाहन केलं.

मात्र, आमदारांच्या या राजकीय भाषणाला कार्यक्रमात उपस्थित काही लोकांनी आक्षेप घेतला. हा सामाजिक कार्यक्रम असल्याने येथे राजकीय मुद्द्यांवर बोलण्याऐवजी भगवान बिरसा मुंडा यांचे विचार आणि आदिवासी समाजाच्या जल, जंगल आणि जमिनीच्या प्रश्नांवर चर्चा करावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यामुळे कार्यक्रमस्थळी काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं.

आमदारांनी विचारला राजीनाम्याचा सवाल

विरोध वाढल्यानंतर आमदार कमलेश्वर डोडियार नाराज झाले. त्यांनी मंचावरूनच उपस्थितांना 'मी राजीनामा देऊ का?' असा प्रश्न विचारला. त्यावर समोर बसलेल्या लोकांनी 'देऊन टाका' असं उत्तर दिलं. यावर डोडियार यांनीही 'ठीक आहे, देतो; पण त्यासाठी भोपाळला जावं लागेल,' असं म्हटलं. या संवादाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आमदार डोडियार यांनी दिलं स्पष्टीकरण

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आमदार डोडियार यांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं. कार्यक्रमात काही उपद्रवी प्रवृत्तीचे लोक आपल्याबद्दल चुकीच्या टिप्पणी करत होते. त्यातून आपल्याला चिथावण्याचा प्रयत्न केला जात होता. कार्यक्रमातील वातावरण शांत करण्यासाठीच आपण आमदारकीचा राजीनामा देण्याबाबत वक्तव्य केल्याचं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, या कार्यक्रमाच्या आयोजकांनीही स्पष्टीकरण दिलं आहे. हा कोणत्याही राजकीय पक्षाचा कार्यक्रम नसून दोन सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन त्याचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसल्याचं आयोजकांनी स्पष्ट केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT