Kanhaiya Kumar,  Jignesh Mevani joins Congress
Kanhaiya Kumar, Jignesh Mevani joins Congress 
देश

कन्हैया अन् जिग्नेश मेवानी यांनी सांगितलं काँग्रेसमध्ये येण्याचं कारण...

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : मागील अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या कम्युनिस्ट नेता कन्हैया कुमार व गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवानी यांचा अखेर काँग्रेसमध्ये मंगळवारी प्रवेश झाला. यापूर्वी काँग्रेसवर अनेकदा टीका करणाऱ्या कन्हैया व जिग्नेश मेवानी यांनी यावेळी काँग्रेसमध्ये येण्याचं कारण स्पष्ट केलं. काँग्रेसचा उल्लेख मोठं जहाज असं करत कन्हैयानं या जहाजाला वाचवण्यासाठी आल्याचं वक्तव्य केलं.

पत्रकार परिषदेत बोलताना कन्हैया म्हणाला, देशातील चिंतन परंपरा, संस्कृती, याचे मुळ, इतिहास, भविष्य मलिन करण्याचा प्रयत्न काही विचारांकडून केला जात आहे. हे वाचवण्यासाठी मी देशातील सर्वात जुन्या लोकशाहीवादी पक्षात आलो आहे. या देशातील लाखो-कोट्यवधी तरूणांना वाटत आहे की, काँग्रेस वाचली नाही तर देश वाचणार नाही. आज देशाला भगतसिंग यांच्यासारख्या साहसाची, आंबेडकरांच्या समानतेची, गांधीजींच्या एकतेची गरज आहे.

जेव्हा विरोधी पक्ष कमजोर होतो, त्यावेळी सत्ताधारी लोकशाही विसरून जातो. देशातील लोकसभेत 545 जागा आहे. त्यापैकी किमान 200 जागांवर देशात भाजपला केवळ काँग्रेसच लढा देऊ शकते. मोठ्या जहाजाला वाचवलं नाही, तर छोट्या नौकाही वाचणार नाहीत. देशात सुरू असलेल्या वैचारिक संघर्षात काँग्रेसला ताकद द्यायला हवी, त्यासाठी काँग्रेसमध्ये दाखल झाल्याचे कन्हैया याने स्पष्ट केलं.

मेवानी म्हणाले, देश एका अभूतपुर्व संकटातून जात आहे. संविधानावर, लोकशाहीवर हल्ला होत आहे. दिल्ली व नागपूर एकत्र येऊन देशात तिरस्कार पसरवत आहेत. काहीही करून या देशाच्या संविधान व लोकशाहीला वाचवायचे आहे. त्यासाठी स्वतंत्रता आंदोलनाचे नेतृत्व केलेल्या पक्षासोबत राहायला हवे. त्यामुळे या विचारासोबत आज जोडले गेलो आहे. राष्ट्रीय स्तरावर आज जे होत आहे, ते आम्ही गुजरातमध्ये झेलले आहे, असे मेवानी यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, पंजाबमधील राजकीय संकटावर पत्रकारांकडून प्रश्नांची सरबत्ती होण्याची शक्यता लक्षात घेऊन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या पत्रकार परिषदेला सामोरे जाण्याचे टाळल्याची चर्चा आहे. कन्हैया व मेवानी हे दोघे पत्रकार परिषदेत येण्यापूर्वी मुख्यालयात राहुल गांधींना भेटले. तिथे कन्हैया कुमार याने पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा अर्ज भरला. त्यानंतर कन्हैया व मेवाणी यांचे पत्रकार परिषदेत इतर काँग्रेस नेत्यांनी पक्षात औपचारिक स्वागत केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT