nitish lalu prasad yadav
nitish lalu prasad yadav Sarkarnama
देश

बिहारींना नोकरी, शिक्षणच नव्हे तर हनीमूनसाठीही इतर राज्यात जावं लागतं

सरकारनामा ब्यूरो

पाटना : बिहारमध्ये (Bihar) सध्या पोटनिवडणूकांचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. कुशेश्वरस्थान आणि तारापूर या दोन्ही जागांसाठीच्या पोटनिवडणूकांसाठी ३० ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून २ नोव्हेंबर रोजी या जागांचे निकाल जाहिर होणार आहेत. अशातच काँग्रेसमध्ये नव्याने सामील झालेले कन्हैय्या कुमार सध्या या पोटनिवडणूकीच्या प्रचाराला लागले आहेत. त्यावेळी एका प्रचारसभेत बोलताना कन्हैय्या कुमारने (kanhaiya kumar ) नितीश कुमार (Nitish kumar) सरकारवर केलेल्या एका टीकेची चांगलीच चर्चा होत आहे.

बिहारच्या लोकांना हनीमूनसाठीही दुसऱ्या राज्यांत जावं लागतं, असा खोचक टोला कन्हैय्या कुमारने लगावला आहे.

तारापूरमधून काँग्रेसकडून राजेश कुमार मिश्रा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याच राजेश कुमार मिश्रा यांच्या प्रचारार्थ कन्हैय्या कुमार तारापूरमध्ये गेले होते. यावेळी ते बोलताना म्हणाले, बिहारमधील नागरिकांना केवळ नोकरी, शिक्षण, उपचारांसाठीच नव्हे तर हनीमूनसाठीही दुसऱ्या राज्यात जावं लागतं. बिहारमध्ये विस्थापितांचा प्रश्न मोठा आहे. इथे विकास कुठेच दिसत नाही, अशी टीका कन्हैय्या कुमारने केली आहे. तसेच, काँग्रेस हा खूप मोठा पक्ष आहे. मोठ्या पक्षासाठी मन मोठे आणि खुले ठेवायला हवे. छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज नाही. जनतेचा पाठिंबा महत्त्वाचा असतो. असे म्हणत कन्हैय्या कुमारने आरजेडीवर देखील टीका केली आहे.

ऐन निवडणूकीच्या तोंडावर काँग्रेस-आरजेडीत मतभेद :

बिहारमध्ये गतवर्षी विधानसभा निवडणूकीपूर्वी काँग्रेस, आरजेडी आणि डाव्या पक्षांनी एकत्र येत महाआघाडी स्थापन केली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस व आरजेडीचे संबंध बिघडलेले होते. अशातच राज्यात विधानसभेच्या दोन जागांवर होणाऱ्या पोटनिवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर या दोन्ही पक्षांतील तीव्र मतभेद उघडकीस आले होते. तारापूर आणि कुशेश्वरस्थान विधानसभा मतदारसंघांपैकी एक जागेवर काँग्रेसने दावा केला होता. पण आरजेडीने दोन्ही जागांवर त्यांचे उमेदवार उभे केले. त्यानंतर काँग्रेसनेही दोन उमेदवारांची घोषणा केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT