अभिनेत्री रन्या राव यांच्याशी संबंधित १०२.५५ कोटींच्या सोन्याच्या तस्करी प्रकरणात EDने आरोपपत्र दाखल केले.
या प्रकरणात आंतरराष्ट्रीय स्तरावर युगांडाशी संबंधित व्यवहार उघड झाले आहेत.
या मोठ्या तस्करी रॅकेटमुळे देशभरात खळबळ उडाली आहे.
kannada actress Ranya Rao case : कन्नड चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री रन्या राव आणि तिच्या सहकाऱ्यांकडून चालवण्यात येत असल्याचा संशय असलेल्या मोठ्या सोन्याच्या तस्करी प्रकरणाचे धक्कादायक तपशील एकामागोमाग उघड होत आहेत. सुमारे १०२.५५ कोटी रुपयांच्या सोन्याची भारतात बेकायदेशीर आयात केल्याच्या आरोपांप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी न्यायालयात विस्तृत आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणात युगांडातील एजंटस्सोबत झालेल्या व्यवहारांची माहितीही समोर आली आहे.
तपासानुसार रन्या राव केवळ दुबईपुरती मर्यादित नसून आफ्रिकन देशांमधूनही सोने आणण्याचा कट रचत होती. यासाठी युगांडातील एका एजंटसोबत तिचा सतत संपर्क होता. सुरुवातीला पाच किलो सोन्याची चाचणी म्हणून वाहतूक करण्यात आली. त्यानंतर तब्बल ५० किलो सोन्यांचा मोठा व्यवहार ठरवण्यात आला. या व्यवहारासाठी दुबईत ‘वीरा डायमंड्स ट्रेडिंग’ नावाची कंपनीही स्थापन करण्यात आली होती.
तथापि, या बेकायदेशीर व्यवहारात रन्या राव आणि तिचा सहकारी राजू यांना फसवणुकीलाही सामोरे जावे लागले. सोन्याच्या खरेदीसाठी ३३ लाख रुपये आगाऊ देण्यात आले होते. जानेवारी २०२४ मध्ये राजू युगांडातील कंपाला येथे गेला असता, एजंटने अतिरिक्त १.७ कोटी रुपयांची मागणी केली. दुबईमार्गे ही रक्कम देण्यास तयार झाल्यानंतरही अखेर त्यांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले. यानंतर त्यांनी स्थानिक पोलिसांकडे तक्रार करण्याचा प्रयत्न केला होता.
रन्या राव ३ मार्च २०२५ रोजी दुबईहून बंगळुरातील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरली असता, डीआरआय अधिकाऱ्यांनी तपासणी केली. सखोल तपासात तिच्याकडून १४.२१३ किलो सोने जप्त करण्यात आले. पुढील तपासात मार्च २०२४ ते मार्च २०२५ दरम्यान सुमारे १२७.२८७ किलो परदेशी सोने भारतात आणल्याचे उघड झाले. हे सोने स्थानिक बाजारात विकून मिळालेली रक्कम हवाला मार्गाने हस्तांतरित केल्याचेही समोर आले आहे.
या गंभीर प्रकरणात ‘ईडी’ने रन्या रावच्या नावावर असलेल्या ३४.१२ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर तात्पुरती जप्ती आणली आहे. तसेच छाप्यात २.६७ कोटी रुपये रोख आणि २.०६ कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. सध्या रन्या राव परप्पन अग्रहार कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे.
1. रन्या राव प्रकरण काय आहे?
सोन्याच्या बेकायदेशीर आयातीशी संबंधित तस्करी प्रकरण आहे.
2. किती रकमेचा घोटाळा आहे?
सुमारे १०२.५५ कोटी रुपयांचा.
3. या प्रकरणात कोण तपास करत आहे?
अंमलबजावणी संचालनालय (ED).
4. युगांडाचा या प्रकरणाशी काय संबंध आहे?
तस्करीसाठी युगांडातील एजंट्ससोबत व्यवहार झाले असल्याचे समोर आले आहे.
5. पुढे काय होऊ शकते?
तपासातून आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.