karnataka congress president post politics sarkarnama
देश

Congress News : काँग्रेसमध्ये बड्या नेत्यांच्या भेटीगाठी : प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चांना सुरुवात; इच्छुकांच्या दिल्ली दौऱ्यांनी वाढवलं तापमान

karnataka congress president politics : कर्नाटक काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री बदलाची चर्चा नव्याने सुरू झाली असतानाच आता प्रदेशाध्यक्षपद बदलाच्या चर्चांना जोर धरला आहे.

Aslam Shanedivan

  1. कर्नाटक काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्षपद बदलाबाबत राजकीय हालचाली वाढल्या असून डी. के. शिवकुमार आणि सतीश जारकीहोळी यांच्या भेटीमुळे चर्चांना वेग आला आहे.

  2. काँग्रेस हायकमांडकडून प्रदेशाध्यक्ष बदलाबाबत संकेत मिळत असल्याने इच्छुक नेत्यांचे दिल्ली दौरे वाढले आहेत.

  3. दोन्ही नेत्यांची भेट विवाह समारंभाच्या निमित्ताने झाल्याचे सांगितले जात असले तरी त्यामागे राजकीय चर्चा असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

dk shivakumar politics : कर्नाटक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी राजकीय डावपेच सुरू झाले आहेत. काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार व प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांच्या भेटीमुळे पक्षांतर्गत हालचाली वाढल्या आहेत. प्रदेशाध्यक्षपद बदलाबाबत काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांकडून काही दिवसांपासून वारंवार संकेत दिले जात आहेत. त्यामुळे इच्छुकांचे दिल्ली दौरे वाढले आहेत. त्यातच बेळगावचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचाही समावेश आहे. मुख्यमंत्री बदलाची चर्चा नव्याने सुरू झाली असतानाच प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चेची भर पडली आहे. शिवकुमार व जारकीहोळी यांच्या भेटीबाबत विचारणा केली असता, एका विवाह समारंभाचे निमित्त पुढे केले जात आहे.

दरम्यान, प्रदेशाध्यक्षपदाची सहा वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शिवकुमार यांनी पक्षातील आमदारांसाठी खास भोजनाचे आयोजन केले. या कार्यक्रमात पक्षाच्या संघटनात्मक पातळीवर काही महत्त्वाच्या घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने काँग्रेस वर्तुळात उत्सुकता वाढली आहे. सत्तेतील अंतर्गत सत्ता संतुलन, पुढील राजकीय रणनीती आणि नेतृत्वातील बदल या सर्व बाबींवर या बैठकीत संकेत मिळू शकतात, अशी चर्चा आहे. राज्यातील जातीय आणि राजकीय समीकरणांच्या माध्यमातून जारकीहोळी यांचे नाव प्रदेशाध्यक्षपदासाठी पुढे केले जात आहे. बुद्ध, बसव आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार करत संघटनात्मक पातळीवर काम केल्यानेही जारकीहोळी यांचे नाव पुढे आले आहे.

सध्या भाजपचे प्रदेशाध्यक्षपद लिंगायत, तर धर्मनिरपेक्ष जनता दलाचे प्रदेशाध्यक्षपद वक्कलिग समाजाकडे आहे. त्यामुळे काँग्रेसकडून ‘अहिंद’ मतदारसमूहाचे एकत्रीकरण करण्याचा प्रयत्न होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दुसरीकडे जारकीहोळी स्वतःही दीर्घकालीन राजकीय रणनीती आखत असल्याचे संकेत मिळत आहेत. २०२८ मध्ये मुख्यमंत्री पदासाठी प्रयत्न करणार असल्याचे यापूर्वी त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्यापूर्वी पक्ष संघटनेत प्रभावी भूमिका मिळवून राज्यभर नेतृत्व मजबूत करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

काँग्रेसमधील हालचालींकडे लक्ष

राजकीय सूत्रांच्या मते, केपीसीसी अध्यक्षपदावर बदल झाल्यास पक्षावर संघटनात्मक नियंत्रण मजबूत करणे, सत्तेतील गटबाजी कमी करणे आणि पुढील निवडणुकांसाठी मजबूत रणनिती आखणे यासाठी ही पायरी महत्त्वाची ठरू शकते. तसेच या बदलामुळे राज्यातील काँग्रेसमध्ये नव्या सत्तासमीकरणांना सुरुवात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकूणच, काँग्रेसमध्ये सध्या सुरू असलेल्या हालचालींमुळे केपीसीसी अध्यक्षपद कोणाकडे जाणार, याकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

दरम्यान शिवकुमार यांना उज्ज्वल भवितव्य असल्याचे म्हणत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शिवकुमार यांचे अभिनंदन केले आहे. त्यांच्या या विधानातून मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या शिवकुमार यांना सध्या मुख्यमंत्रिपदाची संधी मिळणार नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. तर २०२८ मध्ये त्याबाबत शक्यता निर्माण होऊ शकते, असा राजकीय संदेश सिद्धरामय्या यांनी अप्रत्यक्षपणे दिल्याचेही बोलले जात आहे.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये , केपीसीसी अध्यक्ष म्हणून सहा वर्षे पूर्ण केलेल्या शिवकुमार यांचे अभिनंदन केले आहे. तसेच शिवकुमार यांच्या संघटन कौशल्य, वैचारिक बांधिलकी आणि कठोर परिश्रमाचे कौतुक करत त्यांच्या कार्यपद्धतीतून पक्षातील तरुण नेत्यांना प्रेरणा मिळत असल्याचे म्हटले.

तर विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून खोटे गुन्हे दाखल करून विविध प्रकारे त्रास दिला, तरीही शिवकुमार यांनी न डगमगता पक्षाशी निष्ठा राखली. काँग्रेसबद्दलची त्यांची ही निष्ठा लाखो कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी आहे. माझ्यापेक्षा वयाने लहान असलेल्या शिवकुमार यांना उज्ज्वल राजकीय भविष्य असून २०२८ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पुन्हा सत्तेत आणणे हे आपले ध्येय असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्याच्या याच वक्तव्यामुळे शिवकुमार यांना यंदा नाही तर २०२८ मध्ये मुख्यमंत्री म्हणून संधी दिली जाऊ शकते अशी चर्चा रंगली आहे.

FAQs :

1. कर्नाटक काँग्रेसमध्ये सध्या प्रदेशाध्यक्ष कोण आहेत?
सध्या कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार आहेत.

2. सतीश जारकीहोळी कोण आहेत?
सतीश जारकीहोळी हे कर्नाटक काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि बेळगावचे पालकमंत्री आहेत.

3. प्रदेशाध्यक्षपद बदलाची चर्चा का सुरू आहे?
काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाकडून काही संकेत मिळाल्याने प्रदेशाध्यक्ष बदलाबाबत चर्चा सुरू झाली आहे.

4. शिवकुमार आणि जारकीहोळी यांच्या भेटीचे कारण काय सांगितले जात आहे?
दोन्ही नेत्यांनी ही भेट विवाह समारंभाच्या निमित्ताने झाल्याचे सांगितले आहे.

5. या घडामोडींचा कर्नाटकच्या राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो?
प्रदेशाध्यक्ष बदल झाल्यास काँग्रेसच्या संघटनात्मक राजकारणात मोठे बदल होऊ शकतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT