

Sonia Gandhi letter from MLA : बिहार विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये खांदेपालटाची चर्चा सुरू झाली आहे. आता थेट पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनाच हटविण्याची मागणी झाल्याने पक्षात खळबळ उडाली आहे. पक्षाच्याच एका आमदाराने पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून तशी मागणी केली आहे. त्यांनी या पदासाठी दुसरे नावही सुचविले आहे.
ओडिशातील कटकचे आमदार मोहम्मद मोकिम यांनी सोनिया गांधींना पत्र लिहिले आहे. या पत्राबाबत मीडियाशी बोलताना मोकिम यांनी सांगितले की, सोनिया गांधी यांना पत्र लिहिले असून पक्ष खूप अडचणीतून जात असल्याचे म्हटले आहे. पक्षाला त्यांचा सल्ला आणि नव्या नेतृत्वाची गरज आहे. मल्लिकार्जून खर्गे यांचे वय त्यांना साथ देत नाही. आपल्या युवा नेतृत्वाला पुढे आणायला हवे.
मोकिम यांनी पक्षाध्यक्ष पदासाठी प्रियांका गांधी यांचे नाव पुढे केले आहे. त्यांनी पत्रात म्हटले आहे की, पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीत पक्षाची कामगिरी खराब राहिली आहे. काही बाबतीत सुधारणा केल्या नाहीत तर पक्ष आणखी अडचणीत जाईल, अशी भीती मोकिम यांनी व्यक्त केली आहे.
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविषयीही त्यांनी भाष्य केले आहे. राहुल गांधी आमचे नेते आहेत. ज्याप्रमाणे इंदिरा गांधी आणि राजीव गांधी लोकांना भेटत होते, त्यांच्या समस्या ऐकून घेत त्या सोडविण्याचा प्रयत्न करत होते, त्याप्रमाणे राहुल गांधी यांनीही करावे. ते आधी असे करत होते. पण मागील पाच वर्षांत असे होताना दिसत नाही. नेत्यांना, कार्यकर्त्यांना ते भेटले नाहीत तर सुधारणा कशा होणार, असा सवाल मोकिम यांनी केला.
सोनिया गांधी आणि काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे सदस्य अध्यक्षपदाबाबत्या आपल्या भूमिकेबाबत विचार करतील, अशी आशाही आमदार मोकिम यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, काँग्रेसमधील एक गट खर्गे यांच्या नेतृत्वावर नाराज असल्याची चर्चा मागील काही महिन्यांपासून देशाच्या राजधानीत सुरू आहे. त्यांच्या वयामुळे पक्षसंघटनेची बांधणी करण्यात अडचणी येत असल्याचे बोलले जात आहे. त्याबाबत आता उघडपणे भाष्य केले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.