Raj Thackeray on Karnataka Election 2023  Sarkarnama
देश

Raj Thackeray News: राज ठाकरेंचं मराठी मतदारांना आवाहन; म्हणाले, " ही संधी दवडू नका''; मराठी माणसांच्या प्रश्नांसाठी..

Raj Thackeray to Voters: मराठी उमेदवार कुठल्या पक्षाचा का असेना..

सरकारनामा ब्यूरो

Raj Thackeray on Karnataka Election 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार आज (सोमवार) संपणार आहे. बुधवारी (ता.१०) मतदान होणार आहे. (raj thackeray appeals voters in the border areas vote marathi candidate)

कर्नाटक निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात धार्मिक ध्रुवीकरणावरच भर दिला जात आहे. राम, हनुमान, टिपू सुलतान, विविध मठ असे मतदारांना भावतील असे मुद्दे प्रचारात मांडले जात आहेत.

भाजप, काँग्रेस, जेडीएस अशी तिहेरी लढत आहे. पक्षाच्या स्टार प्रचारकांनी गेल्या पंधरा दिवसात प्रचाराचा धुराळा उडवला आहे. भाजप पुन्हा सत्तेत येण्यासाठी प्रयत्नशील आहे, काँग्रेसने स्थानिक मुद्यांवरुन भाजपला कोंडीत पकडले आहे. तर जेडीएस नेहमीप्रमाणे 'किंग मेकर'च्या भूमिकेत असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नशिब अजमावण्यासाठी निवडणुकीच्या आखाड्यात आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सीमाभागात राहणाऱ्या मराठी भाषिकांना मतदानाचे आवाहन केले आहे. राज ठाकरे यांनी टि्वट करीत मतदारांना मराठी उमेदवारालाच मतदान करा, असे आवाहन केले आहे. "मराठी आमदारच निवडून येतील हे तुम्ही पाहायला हवं, हे तुमच्या आणि पर्यायाने मराठी भाषेच्या हिताचं आहे. ही संधी दवडू नका," असे राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरे आपल्या पोस्टमध्ये म्हणतात..

कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकांसाठी येत्या १० मे ला मतदान आहे. तिथल्या सीमाभागातील माझ्या मराठी मतदार बंधू-भगिनींना माझं आवाहन आहे की मतदान करताना एकजुटीने मराठी उमेदवारालाच मतदान करा.

उमेदवार कुठल्या पक्षाचा का असेना तो मराठी असायला हवा, आणि त्याने निवडून आल्यावर मराठी भाषेची सुरु असलेली गळचेपी, मराठी माणसांवर सुरु असलेला वर्षानुवर्षांचा अन्याय ह्याविरोधात तिथल्या विधानभवनात वाचा फोडायलाच हवी.

तर ते हे खपवून घेतलं जाणार नाही...

तुम्ही ज्या राज्याचे आहात, त्या राज्याची भाषा, तिथली संस्कृती ह्याचा आदर केलाच पाहिजे, ह्या ठाम मताचा मी आहे. सीमाभागात कित्येक पिढ्या राहणारे बांधव कन्नड भाषा आणि इथली संस्कृती ह्याचा मान राखत आले आहेत. पण तरीही तिथलं सरकार जर मराठी माणसांना त्रास देणार असेल, मराठी भाषेची गळचेपी करण्याचा प्रयत्न करणार असेल तर ते हे खपवून घेतलं जाणार नाही.

अनेकांची कुलदैवतं कर्नाटकात आहेत

मध्यंतरी जेंव्हा पुन्हा एकदा सीमावदाला कर्नाटक सरकारकडून खतपाणी घालून वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला होता, तेंव्हा मी म्हणलं होतं की कर्नाटक आणि महाराष्ट्रात मुळात एकजिनसीपणा आहे. इथल्या अनेकांची कुलदैवतं कर्नाटकात आहेत तर अनेक कन्नडिगांची कुलदैवतं महाराष्ट्रात आहेत.

तर संघर्षाची वेळच येणार नाही..

थोडक्यात दोन राज्यांतील बंध हा मजबूत आहे. तेंव्हा खरंतर कर्नाटक सरकारने सामंजस्याची भूमिका घेतली तर संघर्षाची वेळच येणार नाही. पण कुठल्याही पक्षाचं सरकार तिकडे येऊ दे त्यांच्या वागण्यात यत्किंचितही फरक नसतो. म्हणूनच तिथल्या विधानभवनात मराठी भाषिक आमदार, जो त्या भागातील मराठी अस्मितेचं प्रतिनिधित्व करेल, मराठी माणसांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवेल अशी लोकं असायला हवीत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT