Karnataka Government School Dress Code : कर्नाटक सरकारने सरकारी शाळांमधील ड्रेसकोडबाबत पुन्हा एकदा स्पष्ट भूमिका घेत भगवी शाल (केशरी शाल) परिधान करण्यास परवानगी दिली जाणार नसल्याचे जाहीर केले आहे.
शिक्षणमंत्री मधु बंगारप्पा यांनी याबाबत स्पष्ट इशारा देत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असे सांगितले.
कर्नाटक राज्यात 1 जूनपासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत असून, शाळा पुन्हा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर हिजाब आणि भगवी शाल या मुद्द्यांवर राजकीय वातावरण तापू लागले आहे. कर्नाटक राज्यात काँग्रेसचे सरकार आहे. काँग्रेसविरुद्ध भाजप (BJP) असा राजकीय संघर्ष टोकाला पोहोचला आहे. आता शाळेतील ड्रेस कोडवरून राजकीय वाद उफाळला आहे.
या संदर्भात माध्यमांशी बोलताना कर्नाटक (Karnataka) राज्याचे शिक्षक मंत्री बंगारप्पा म्हणाले, “हिजाब प्रकरणावर आमची भूमिका आधीपासून स्पष्ट आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यातही आम्ही त्याचा उल्लेख केला होता. जनतेने आमच्यावर विश्वास दाखवला आणि आम्ही दिलेले आश्वासन पूर्ण केले.”
भाजपवर निशाणा साधताना त्यांनी केंद्रीय विद्यालयांचा मुद्दाही उपस्थित केला. “भाजपने आधी केंद्र सरकारच्या केंद्रीय विद्यालयांमधील नियम पाहावेत. कर्नाटकातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या परंपरेनुसार जानवे, हिजाब, शिवधारा, रुद्राक्ष यांसारखी धार्मिक प्रतिके वापरण्याची मुभा असेल. मात्र, भगवी शाल परिधान करण्यास परवानगी दिली जाणार नाही,” असे ते म्हणाले.
दरम्यान, या निर्णयामुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसत आहेत. हिजाब व भगवी शाल वादावरून यापूर्वीही कर्नाटकात मोठा राजकीय संघर्ष पाहायला मिळाला होता. आता नवीन शैक्षणिक सत्र सुरू होत असताना सरकारच्या या भूमिकेमुळे विरोधकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कर्नाटक सरकारने शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हिजाब बंदी 2022 मध्ये निर्णय घेतला होता. त्यावरून गदारोळ होताच, तो मागे घेण्यात आला. नवीन आदेशानुसार, विद्यार्थ्यांना हिजाब व्यतिरिक्त कलावा, रुद्राक्ष आणि जानवे घालण्याचीही परवानगी देण्यात आली आहे. कर्नाटकच्या तत्कालीन भाजप सरकारने फेब्रुवारी 2022 मध्ये एक आदेश जारी केला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.