Karnataka Zilla and Taluka Panchayat Elections Sarkarnama
देश

Karnataka Panchayat Election : इच्छुक उमेदवारांना मोठा दिलासा! जिल्हा, तालुका पंचायत निवडणुकांचा मार्ग मोकळा; कर्नाटकात इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू

Karnataka Zilla and Taluka Panchayat Elections : कर्नाटक राज्यातील ३० जिल्ह्यांमधील १, १०१ जिल्हा पंचायत मतदारसंघ आणि २३४ तालुका पंचायतींच्या ३, ५८० सदस्यपदांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.

Aslam Shanedivan

Karnataka News : कर्नाटक राज्यातील 30 जिल्ह्यांमधील 1,101 जिल्हा पंचायत मतदारसंघ आणि 234 तालुका पंचायतींच्या 3,580 सदस्यपदांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. यासंदर्भातील अंतिम अधिसूचना सरकारने प्रसिद्ध केल्याची माहिती ग्रामीण विकास व पंचायत राजमंत्री ईश्वर बी. खांड्रे यांनी दिली.

बंगळूर येथे पत्रकारांशी बोलताना खांड्रे म्हणाले की, राज्यातील जिल्हा पंचायत आणि तालुका पंचायत निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. सरकारने या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यपदांच्या आरक्षणाची अंतिम अधिसूचना जारी केली आहे. जानेवारीमध्ये निवडणुका होण्याची शक्यता असल्याची माहितीही खांड्रे यांनी दिली. यामुळे अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या इच्छुक उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. आरक्षणाची अंतिम यादी जाहीर झाल्यामुळे आता आगामी निवडणुकांच्या दृष्टीने राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वी आरक्षणाची प्रारूप यादी जाहीर करण्यात आली होती. तसेच आरक्षणाबाबत आक्षेप मागवण्यात आले होते. त्यानंतर सरकारतर्फे अंतिम आरक्षण निश्चित झाल्यामुळे कोणत्या मतदारसंघातून कोणत्या प्रवर्गातील उमेदवार निवडणूक लढवू शकणार, याचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांनी आपापल्या मतदारसंघात राजकीय समीकरणांची जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली आहे. काही ठिकाणी संभाव्य उमेदवारांकडून मतदारांशी संपर्क वाढविण्यावर भर दिला जात असून, तर काही ठिकाणी पक्षांतर्गत उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी सुरू होण्याची चिन्हे आहेत.

काँग्रेस, भाजप, धर्मनिरपेक्ष जनता दलासह महाराष्ट्र एकीकरण समितीकडूनही आगामी निवडणुकीच्या दृष्टीने रणनीती आखली जाण्याची शक्यता आहे. स्थानिक पातळीवरील नेते, कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवार यांच्यातही लगबग सुरू झाली आहे. आरक्षणामुळे काही इच्छुकांना संधी मिळणार असून, काहींना पर्यायी मतदारसंघाचा विचार करावा लागू शकतो. दरम्यान, आरक्षणाची अंतिम अधिसूचना जारी झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर होणाऱ्या निवडणूक कार्यक्रमाकडे लागले आहे.

निवडणुकीच्या तारखांकडे लक्ष

निवडणुकीच्या तारखा, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आणि मतदानाचा दिवस कधी निश्चित होणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. आरक्षणाची अंतिम अधिसूचना हा जिल्हा पंचायत आणि तालुका पंचायत निवडणुकांच्या प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच रणधुमाळीला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे. त्यामुळे स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांचे लक्ष निवडणूक कार्यक्रमाकडे लागले आहे.

अशातच तालुका आणि जिल्हा पंचायतींसाठी आरक्षण निश्चित केल्याची माहिती ग्रामीण विकास व पंचायत राजमंत्री ईश्वर बी. खांड्रे यांनी दिली आहे. जिल्हा पंचायत आणि तालुका पंचायतींचा कार्यकाळ 2022 मध्येच संपला होता. मात्र, तत्कालीन सरकारने निवडणुका घेतल्या नव्हत्या. त्यानंतर विद्यमान सरकारने काही ग्रामपंचायतींचा दर्जा वाढविला, तर काही ग्रामपंचायतींचा समावेश नगरपालिका, नगर परिषद आणि महानगरपालिका हद्दीत केला. त्यामुळे मतदारसंघांची पुनर्रचना करणे आवश्यक झाले होते. यामुळे निवडणुकांना विलंब झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

51 लाखांहून अधिक मुलांची अरिवू केंद्रांमध्ये नोंदणी

अरिवू केंद्रांमध्ये 6 ते 18 वयोगटातील मुलांना विनामूल्य ग्रंथालय सदस्यत्व देण्यात आले आहे. तसेच ग्रंथालयातील पुस्तके घरी नेऊन वाचण्याची सुविधाही उपलब्ध आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण ग्रंथालयांमध्ये 51 लाखांहून अधिक मुलांनी सदस्य म्हणून नोंदणी केली आहे. अरिवू केंद्रांमध्ये ग्रंथपाल म्हणून काम करणाऱ्यांना दरमहा 19,201 रुपये मानधन देण्याची हमी दिली आहे. राज्यातील सर्व 6,342 ग्रामवाचनालये औपचारिकरीत्या सुरू झाल्याची घोषणाही खांड्रे यांनी केली.

निवडणुकांसाठी सरकार सज्ज

निवडणुकांसाठी सरकारने आपली जबाबदारी पूर्ण केली असून, आता राज्य निवडणूक आयोग निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करून प्रक्रिया पूर्ण करेल. काँग्रेस या निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचेही खांड्रे यांनी सांगितले. आरक्षणासंबंधी सर्व अधिसूचना राज्याच्या अधिकृत राजपत्राच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT