IAS Gyanendra Kumar Gangwar Sarkarnama
देश

IAS officer arrested : KPSC भरतीतील कथित गैरप्रकार; IAS अधिकारी ज्ञानेंद्र गंगवार यांना CIDकडून अटक

IAS officer Gyanendra Kumar Gangwar arrested by Karnataka CID in alleged KPSC veterinary recruitment irregularities case : पशुवैद्यकीय अधिकारी भरती परीक्षेतील कथित अनियमितता प्रकरणात दोन दिवसांच्या चौकशीनंतर कारवाई; OMR शीट्स, गुणांतील फेरफार आणि परीक्षा प्रक्रियेची CIDकडून चौकशी

Pradeep Pendhare

KPSC Veterinary Officer Recruitment : कर्नाटक लोकसेवा आयोगाच्या (KPSC) पशुवैद्यकीय अधिकारी भरती परीक्षेतील कथित अनियमितता प्रकरणात भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) अधिकारी ज्ञानेंद्र कुमार गंगवार यांना CIDने अटक केली आहे.

दोन दिवसांच्या चौकशीनंतर ही कारवाई करण्यात आली. तपासात सहकार्य करत नसल्याचा आरोप अधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे.

गंगवार हे 2016 च्या तुकडीचे IAS अधिकारी असून, कथित अनियमितता घडली त्या कालावधीत ते KPSCमध्ये परीक्षा नियंत्रक म्हणून कार्यरत होते. ते फेब्रुवारी 2024 ते मार्च 2026 या काळात या पदावर होते. सध्या ते कर्नाटकच्या उद्योग व वाणिज्य विभागात सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांचे (MSME) संचालक म्हणून कार्यरत आहेत.

CIDने शुक्रवारी गंगवार यांची जवळपास नऊ तास चौकशी केली. त्यानंतर शनिवारीही त्यांची चौकशी सुरू राहिली. दोन दिवसांत तब्बल 20 ते 21 तासांहून अधिक काळ त्यांची चौकशी झाल्याचे वृत्त आहे. चौकशीदरम्यान त्यांनी तपासात सहकार्य केले नसल्याचे सांगत CIDने त्यांना ताब्यात घेतले आणि त्यानंतर अटक केली. तपास यंत्रणा KPSCच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरती परीक्षेतील परीक्षा नोंदी, OMR शीट्स आणि गुणांमध्ये कथित फेरफार, तसेच या प्रक्रियेत सहभागी असलेल्या अधिकारी व इतर व्यक्तींच्या भूमिकेचा तपास करत आहे.

400 पदांच्या भरती परीक्षेचा तपास

ही परीक्षा पशुसंवर्धन विभागातील 400 पशुवैद्यकीय अधिकारी पदांच्या भरतीसाठी घेण्यात आली होती. परीक्षेच्या प्रक्रियेत कथित गैरप्रकार झाल्याच्या आरोपांनंतर CIDने तपास हाती घेतला आहे. या प्रकरणात परीक्षा प्रक्रियेतील कागदपत्रे आणि OMR शीटच्या हाताळणीवरही तपास यंत्रणेचे लक्ष आहे.

EDचीही स्वतंत्र चौकशी

या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) देखील स्वतंत्र तपास सुरू केला आहे. 23 ऑगस्ट रोजी EDने बंगळुरू आणि उत्तर प्रदेशातील बरेली येथील गंगवार यांच्याशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकले होते. हा तपास कथित अनियमिततेशी संबंधित मनी लाँड्रिंगच्या आरोपांवर केंद्रित आहे. या प्रकरणाची सुरुवातीला विधान सौध पोलिस ठाण्यात नोंद झाली होती. त्यानंतर 28 जुलै रोजी तपास CIDकडे वर्ग करण्यात आला. पशुसंवर्धन विभागातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरती प्रक्रियेत KPSCच्या अधिकाऱ्यांकडून कथित अनियमितता झाल्याचा आरोप आहे.

न्यायालयीन कोठडीत रवानगी

अटकेनंतर गंगवार यांना प्रथम अतिरिक्त मुख्य न्यायिक दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून परप्पना अग्रहारा कारागृहात हलवण्यात आल्याचे वृत्त आहे. CID पुढील तपासासाठी त्यांची कोठडी मागण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT