

Kalyan Lok Sabha constituency : खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या अयोध्या पौळ पाटील यांनी ‘पोलखोल’ सुरू केली आहे.
मतदारसंघातील नागरी समस्या आणि विकासकामांशी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत त्यांनी खासदार शिंदे यांच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले आहेत. हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर आणखी खूप आहेत, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
काही दिवसांपूर्वी खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी मुंबईतील वरळी समुद्रकिनारी वाहून आलेल्या कचऱ्याच्या मुद्द्यावरून ठाकरेंना टार्गेट केले होते. त्यानंतर आता अयोध्या पौळ पाटील यांनी थेट शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघात जाऊन तेथील नागरी समस्यांकडे लक्ष वेधले आहे. त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट आणि व्हिडिओंमुळे शिंदे आणि शिवसेना ठाकरे पक्षातील राजकीय संघर्षाला नवा मुद्दा मिळण्याची शक्यता आहे.
अयोध्या पौळ यांनी मतदारसंघातील काही भागांमध्ये कचऱ्याचे ढिगारे असल्याचा दावा करत त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. लोकवस्तीच्या परिसरात कचरा साचल्याने दुर्गंधीचा त्रास होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यासोबतच त्यांनी रस्त्यांच्या दुरवस्थेचाही मुद्दा उपस्थित केला. रस्त्यांची अवस्था दाखवताना अयोध्या पौळ यांनी त्यांची तुलना शिवसेनेचे (Shivsena) नेते गुलाबराव पाटील यांच्या गालाशी केली. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याचीही राजकीय चर्चा होण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये खासदार आदर्श ग्राम योजनेअंतर्गत खासदारांनी गावे दत्तक घेऊन विकास करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार खासदार श्रीकांत शिंदे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातील नागाव गाव दत्तक घेतल्याचा संदर्भ देत अयोध्या पौळ यांनी गावातील विकासकामांवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
नागावमध्ये पोहोचून त्यांनी गावातील विविध ठिकाणांचे व्हिडिओ केले. एका मंदिराशेजारील तलावाला दगडांचे कठडे बांधण्यात आल्याचे दाखवत त्यांनी, शिंदे साहेब, एवढेच पालकत्व आहे का? असा सवाल केला. हा फक्त ट्रेलर आहे. एक-दोन नाही, अनेक पिक्चर होतील, असे म्हणत त्यांनी पुढील काळात आणखी काही मुद्दे समोर आणण्याचा इशारा दिला.
अयोध्या पौळ यांनी दुसऱ्या एका दत्तक गावातील तलावाचाही मुद्दा उपस्थित केला. सुमारे 84 एकर क्षेत्रात असलेल्या तलावातील गाळ काढण्याच्या कामावर त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. तलावातील गाळ काढणे म्हणजे सुशोभीकरण कसे? असा सवाल त्यांनी केला. या माध्यमातून अयोध्या पौळ यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघातील विकासकामांवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांच्या या व्हिडिओंना सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळत असून, आगामी काळात शिंदे आणि ठाकरे गटामध्ये ‘काम विरुद्ध काम’ असा राजकीय सामना रंगण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.