Manoharlal Khattar on Kumari Selja Sarkarnama
देश

Kumari Selja: हरियाणात 'खेला' होणार! ; काँग्रेसच्या कुमारी शैलजा भाजपमध्ये प्रवेश करणार?

Mayur Ratnaparkhe

Haryana Vidhan sabha Election : हरियाणात विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत तसा तेथे राजकीय घडामोडींना वेग येत आहे. आता हरियणात भाजप 'खेला' करणार असल्याचं दिसत आहे. तेथील काँग्रेसच्या दिग्गज नेत्या कुमारी शैलजा यांना भाजपकडून पक्ष प्रवेशाची ऑफर मिळाल्याची माहिती असून, लवकरच त्यांचा पक्ष प्रवेशही होवू शकतो असंही बोललं जात आहे.

त्यामुळे जर असं घडलं तर हा ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेससाठी मोठा धक्का असणार आहे. त्यामुळे आगामी काळात शैलजा या भाजपमध्ये खरंच प्रवेश करणार का?, भाजप(BJP) मोठा डाव टाकणार का?, हुड्डा आणि शैलजा यांच्यातील शीतयुद्धामुळे काँग्रेसची नौका बुडणार का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

काय आहे संपूर्ण प्रकरण? -

हरियाणात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेथील संपूर्ण राजकारण हे काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा यांच्या अवतीभोवती फिरताना दिसत आहे. तर प्राप्त माहितीनुसार भाजप मोठा डाव टाकण्याच्या तयारीत असून, थेत कुमारी शैलजा यांनाच पक्ष प्रवेशाची ऑफर दिली गेली आहे.

माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीयमंत्री मनोहरलाल खट्टर(Manoharlal Khattar) यांनी म्हटले की, काँग्रेसमध्ये कुमारी शैलजा यांचा अपमान होत आहे. तर कुमारी शैलजा यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांबाबत बोलताना खट्टर यांनी सांगितले की, शक्यता नाकारता येणार नाही. योग्य वेळ आली की सर्व काही समजेल. दरम्यान काँग्रेसकडून सांगितले जात आहे की, पक्षात सगळंकाही ठीक आहे आणि सर्वजण मिळून निवडणूक लढवतील.

शैलजा यांच्या नाराजीचे कारण? -

हरियाणा काँग्रेस(Congress)मधील अंतर्गत वाद समोर येत आहे. सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती मिळाली आहे की, भूपेंद्र सिंह हुड्डा गटाच्या लोकांना तिकीट वाटपात झुकतं माप दिलं गेल्याने, कुमारी शैलजा नाराज आहेत आणि आतापर्यंत प्रचारातही उतरलेल्या नाहीत.

सूत्रांनी असाही दावा केला आहे की, हुड्डा यांच्याशिवाय बाकी सर्व नेत्यांना तिकीट वाटपात दुर्लक्षित केलं गेलं आहे. शैलजा स्वत: उकलाना येथून निवडणूक लढवू इच्छित होत्या. मात्र पक्षाने त्यांना तिकीट नाकारलं. तर अशीही माहिती आहे की, काँग्रेस पार्टी शैलजा यांचा पुतण्या हर्ष यांना उकलना येथून उमेदवारी देण्यास तयार होती, मात्र शैलजा यासाठी तयार नव्हत्या.

काँग्रेस उमेदवारांच्या यादीत ९० पैकी केवळ ७ उमेदवार आहेत, जे कुमारी शैलजा यांचे निकटवर्तीय मानले जातात. ज्यामध्ये चार विद्यमान आमदार आहेत आणि तीन नवीन चेहऱ्यांचा समावेश आहे. ९० पैकी ७८च्या आसपास उमेदवार हे हुड्डा गटाचे आहेत. सात शैलजा गटाचे आणि दोन सुरजेवाला असून काही उमेदवार हे हायकमांडकडून निश्चित केले गेले आहेत, जे या पैकी कोणत्याही गटाशी संबंधित नाहीत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT