Amit Shah and Laxmikant Parsekar  Sarkarnama
देश

शहांची राज्यसभा अन् राज्यपालपदाची ऑफर धुडकावून माजी मुख्यमंत्री विधानसभेवर ठाम

गोव्यात (Goa) विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) तोंडावर भाजपला(BJP) मोठा धक्का बसला.

सरकारनामा ब्युरो

पणजी : गोव्यात (Goa) पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) तोंडावर भाजपला(BJP) मोठा धक्का बसला. माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर (Laxmikant Parsekar) यांनी पक्षाला रामराम केला आहे. खद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) आणि पक्षाचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी दिलेली राज्यसभा अथवा राज्यपालपदाची ऑफरही त्यांनी धुडकावल्याचे समोर आला आहे.

गोव्यातील भाजप उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याआधी पार्सेकर यांना दिल्लीत बोलावून घेण्यात आले होते. पक्षाचे अध्यक्ष नड्डा, अमित शहा आणि सरचिटणीस बी.एल.संतोष यांनी पार्सेकरांसोबत बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी पार्सेकरांशी चर्चा केली होती. या चर्चेत पार्सेकरांना राज्यसभा अथवा राज्यपालपद असे दोन पर्याय देण्यात आले होते. परंतु, पार्सेकर हे विधानसभेवर ठाम होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

पार्सेकर यांचे मन वळवण्याचा प्रयत्न पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी केला. मांद्रेम मतदारसंघातील सर्वेक्षणाच्या अहवालही त्यांच्यासमोर मांडण्यात आला. हा अहवाल पार्सेकर यांना अनुकूल नसल्याचेही सांगण्यात आले. या वेळी त्यांची स्थिती मतदारसंघात फारशी भक्कम नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले. तरीही ठाम राहिलेल्या पार्सेकरांनी आपली मागणी लावून धरली. अखेर पक्षनेतृत्वाने त्यांचा नाद सोडून दिला, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

पार्सेकर हे भाजपच्या जाहीरनामा समितीचे प्रमुख होते. ते भाजपच्या कोअर कमिटीचेही सदस्य होते. भाजपचे ज्येष्ठ नेते मानले जाणारे पार्सेकर हे गोव्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. मनोहर पर्रीकर हे केंद्रात संरक्षणमंत्री म्हणून गेल्यानंतर पार्सेकर हे 2014 ते 2017 या काळात मुख्यमंत्री होते. ते पर्रीकरांचे विश्वासू व निकटवर्तीय मानले जात. पार्सेकरांना भाजपने तिकिट नाकारले होते. पार्सेकर यांच्या जागी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले विद्यमान आमदार दयानंद सोपटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

दयानंद सोपटे हे आधी काँग्रेसमध्ये होते. त्यांनी 2017 मध्ये मांद्रेममधून काँग्रेसच्या तिकिटावर लढून पार्सेकरांचा पराभव केला होता. नंतर काँग्रेसच्या इतर नऊ नेत्यांसोबत ते भाजपमध्ये दाखल झाले होते. आता पार्सेकरांना डावलून भाजपने सोपटेंना संधी दिली आहे. यामुळे नाराज झालेल्या पार्सेकरांनी थेट पक्षाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. सोपटे मतदारसंघातील मूळ भाजप कार्यकर्त्यांना डावलत असल्याचा आरोप पार्सेकरांनी केला आहे. यामुळे मतदारसंघात सोपटे यांच्याबद्दल मोठी नाराजी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT