BJP Sarkarnama
देश

भाजपची कोंडी! विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदही नाही

राज्यात प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपला (BJP) विरोधी पक्षनेतेपदही मिळत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

सरकारनामा ब्युरो

रांची : राज्यात प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपला (BJP) विरोधी पक्षनेतेपदही मिळत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. झारखंडमधील (Jharkhand) झारखंड मुक्ती मोर्चा (JMM), काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रीय जनता दलाच्या (RJD) आघाडीच्या सरकारने ही खेळी खेळली आहे. विधानसभेच्या अधिवेशनात यावरून गदारोळ सुरू आहे. मागील दोन वर्षांपासून विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद रिक्त असल्याने यावरून भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे.

माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी यांना विरोधी पक्षनेतेपद द्यावे, अशी मागणी भाजपने विधानसभा अध्यक्षांकडे केली होती. यावर अध्यक्षांनी अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही. भाजपच्या थिंक टँकच्या बैठकीत याच विषयावर जोरदार चर्चा झाली. विधानसभा अधिवेशनात या मुद्द्यावर आक्रमक भूमिका भाजपने घेतली आहे. विरोधी पक्षनेतेपद रिक्त असतानाही विधानसभेचे कामकाज सुरू असल्याबद्दल भाजपमध्ये संतप्त भावना आहेत.

बाबूलाल मरांडी हे आधी जेव्हीएम-पी या पक्षाच्या तिकिटावर गिरीडिह मतदारसंघातून 2019 मध्ये निवडून आले. नंतर त्यांनी हा पक्ष भाजपमध्ये विलिन केला. त्यांना भाजपचे आमदार म्हणून अद्याप विधानसभा अध्यक्ष रविंद्रनाथ महातो यांनी मान्यता दिलेली नाही. याला दोन वर्षे उलटूनही अध्यक्षांनी निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे विरोधी पक्षनेत्याविना विधानसभा सुरू आहे. भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या काल झालेल्या बैठकीत अधिवेशनाबाबत रणनीती ठरवण्यात आली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष दीपक प्रकाश यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला भाजपच्या सर्व आमदारांसह अदिवासी विभागाचे केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा आणि लोकसभा व राज्यसभेतील खासदारही उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT