Marathi Voter: मुंबईत गुजराती-मराठी वाद हा अधुनमधून डोकं वर काढत असतो, असाच वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. या वादात चक्क एका मराठी मतदाराला मतदान करण्यापासून रोखण्यासाठी कट-कारस्थान केल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळं एकच खळबळ उडाली आहे. विषेश म्हणजे महाराष्ट्र सरकारकडं याबाबत प्रस्ताव दाखल झाला होता.
मुंबईतल्या बोरिवलीच्या 'सनराईज व्ह्यू' सोसायटीत मराठी सभासदाचं नाव मतदार यादीतून वगळल्याप्रकरणी सोसायटीच्या ४ पदाधिकाऱ्यांना मोठा दणका मिळाला आहे. डॉ. अनिकेत जोशी यांच्या मतदानाचा अधिकार काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या किरीट ध्रुव, मॉरिस रॉड्रिक्झ, सुनील शाह आणि अंकित शेठ या चार सदस्यांना उपनिबंधक कार्यालयानं पुढील ५ वर्षे निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवलं आहे. यामुळं सोसायट्यांमधील मतदानाच्या अधिकाराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे या चारही पदाधिकाऱ्यांनी चक्क महाराष्ट्र शासनाकडंच मराठी सभासदाचं नाव वगळण्यासाठी अर्ज केला होता. याबद्दल माहिती देताना पीडित सभासद असलेल्या डॉ. अनिकेत जोशी सांगितलं की, "महाराष्ट्र सरकारला मराठी माणसाचं नाव मतदार यादीतून काढून टाका, असं सनराईज व्हूय कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या काही सदस्यांनी लिहून दिलं. पण आज या गैरप्रकारामुळं ते स्वतः निवडणूक लढवण्यास अपात्र ठरले आहेत.
मग आज आपल्याला विचार करण्याची गरज आहे की, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? आज जर मतदार यादीतून एका डॉक्टरचं नाव काढून टाका असं जर कोणी लिहून देत असेल तर जो आपला मराठी माणूस आहे जो इमानेइतबारे दिवसभर मेहनत करुन २०-२५ हजार रुपये कमावत असेल तर त्याला काय प्रकारचा अन्याय सहन करावा लागत असेल? या धनदांडग्यांकडून. त्यामुळं जर मला माध्यमांनी आमची बाजू मांडायची संधी दिली तर या सर्व केसेस आणू इच्छितो."
दरम्यान, महाराष्ट्रात रहिवासी इमारतीत राहणाऱ्या मराठी माणसांना गुजराती रहिवाशांकडून त्रास देण्याचा प्रकार वारंवार घडत आला आहे. अनेकदा मराठी लोक मांसाहार करतात म्हणूनही त्यांना गुजराती लोकांकडून टार्गेट करण्यात आलं आहे. मुंबईत जैन समाजाच्या पर्युषण काळात मुंबईतील मुंबई, वसई-विरार, मीरा-भायंदर, नागपूर आदी माहापालिका क्षेत्रांमध्ये मांसविक्रीची दुकानं बंद ठेवली जातात. यावरुनही अनेकदा मराठी-गुजराती असा संघर्ष निर्माण होऊन त्याचे राजकीय वादात रुपांतर होत असते. पण आता एका उच्चशिक्षित डॉक्टरच्याबाबतीत झालेल्या भेदभावपूर्ण वागणुकीबाबत फडणवीस सरकार काय कठोर पावलं उचलतंय हे पाहावं लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.