How to apply for LIC Bima Sakhi Scheme Sarkarnama
देश

LIC Bima Sakhi Scheme : LIC ची भन्नाट योजना! कामासोबतच होणार बंपर कमाई; दरमहा मिळणार 7,000 रुपये, असा करा अर्ज

LIC monthly income scheme for women: LIC विमा सखी योजना 2026 अंतर्गत महिलांना कामासोबत दरमहा 7,000 रुपये मिळण्याची संधी. पात्रता, फायदे, आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या.

Rashmi Mane

LIC Bima Sakhi Scheme for women: LIC ची बीमा सखी योजना महिलांसाठी उत्पन्नासोबत रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारी महत्त्वाची योजना ठरत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांना विमा क्षेत्रात काम करण्याची संधी मिळते, तसेच नियमित उत्पन्नही मिळू शकते. विशेषतः ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने ही योजना राबवली जात असून, त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

या योजनेअंतर्गत सहभागी होणाऱ्या महिला एलआयसीच्या विमा प्रतिनिधी म्हणून काम करतात. त्यांना विमा योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवणे, नवीन पॉलिसींची नोंदणी करणे आणि विमा जागरूकता वाढवण्याची जबाबदारी दिली जाते. कामाच्या बदल्यात त्यांना कमिशनसोबतच सुरुवातीच्या कालावधीत निश्चित मानधनही दिले जाते.

बीमा सखी योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलेचे वय 18 ते 70 वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे. अर्जदार किमान 10 वी उत्तीर्ण असावी. पात्र महिलांना एलआयसीकडून प्रशिक्षण दिले जाते, ज्यामुळे विमा व्यवसायाची माहिती आणि ग्राहकांशी संवाद साधण्याचे कौशल्य विकसित होते.

या योजनेत पहिल्या वर्षात दरमहा 7,000 रुपये स्टायपेंड दिले जाते. दुसऱ्या वर्षात हे मानधन 6,000 रुपये दरमहा मिळते, तर तिसऱ्या वर्षात 5,000 रुपये मासिक स्टायपेंड देण्याची तरतूद आहे. याशिवाय महिलांनी विक्री केलेल्या विमा पॉलिसींवर स्वतंत्र कमिशनही मिळते. त्यामुळे चांगली कामगिरी करणाऱ्या महिलांचे उत्पन्न आणखी वाढू शकते.

प्रशिक्षणाचा तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर महिला एलआयसीच्या अधिकृत विमा एजंट म्हणून पुढे काम करू शकतात. मात्र, पहिल्या वर्षात विकलेल्या किमान 65 टक्के विमा पॉलिसी सक्रिय राहणे आवश्यक आहे. ठरवून दिलेले विक्रीचे उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या किंवा त्यापेक्षा जास्त कामगिरी करणाऱ्या महिलांना अतिरिक्त प्रोत्साहनपर कमिशनही दिले जाते.

या योजनेत ग्रामीण भागातील महिलांना प्राधान्य दिले जाते. मात्र, आधीपासून एलआयसीचे एजंट असलेल्या व्यक्तींचे निकटवर्तीय किंवा एलआयसी कर्मचाऱ्यांचे काही नातेवाईक या योजनेसाठी पात्र नसतात.

अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन उपलब्ध आहे. इच्छुक महिलांनी एलआयसीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी. अर्ज भरताना वयाचा पुरावा, राहत्या पत्त्याचा पुरावा आणि शैक्षणिक पात्रतेचा दाखला यांसारखी आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज सादर करता येतो. योग्य पात्रता पूर्ण करणाऱ्या महिलांसाठी ही योजना रोजगार आणि नियमित उत्पन्नाची चांगली संधी ठरू शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT