Election Commission C Vigil
Election Commission C Vigil Sarkarnama
देश

Election Coimmission News : मतदारराजा जागा हाय..! तब्बल अडीच लाखांहून अधिक तक्रारींचा पाऊस

Rajanand More

New Delhi News : कोणतीही निवडणूक म्हटलं की, आचारसंहिता आलीच. पण अनेकदा राजकीय पक्ष, उमेदवार, कार्यकर्त्यांकडून नियमांचे सर्रास उल्लंघन केले जाते. मतदार हे सगळं पाहत असतात. तक्रार करायची कुणाकडं? असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यामुळे उमेदवारांचे फावते. पण आता हे विसरून जा... मतदारराजा जागा असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या (Election Coimmission News) आकडेवारीवरून समोर आले आहे.

निवडणूक आयोगाने महिनाभरापूर्वी लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election News) वेळापत्रक जाहीर केले अन् त्याचवेळी आचारसंहिताही लागू झाली. आचारसंहिता (Code of Conduct) म्हणजे आयोगाने निवडणूक काळात घालून दिलेले नियम असतात. त्यानुसार कोणत्या वेळेत प्रचार करावा, प्रचाराच्या साहित्याचा वापर कसा, कुठे करावा, नेत्यांच्या भाषणांवर निर्बंध, पैशांचा वापर किती करावा असे अनेक नियम असतात.

आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर आयोगाकडून कारवाईही केली जाते. पण प्रत्येक ठिकाणी आयोग पोहाेचू शकत नसल्याने या वेळी हे मतदारांनाच याबाबत तक्रार करण्यासाठी आयोगाने ‘सी व्हिजिल’ (C Vigil) ही ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. जागृत मतदारांनीही मागील महिनाभरात तब्बल 2 लाख 67 हजार 762 तक्रारी केल्या आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आयोगाकडून मतदारांनी केलेल्या प्रत्येक तक्रारीचे निराकरण सरासरी शंभर मिनिटांत केले आहे. त्यानुसार तब्बल 92 टक्के तक्रारींवर तातडीने कारवाई करण्यात आली आहे. या तक्रारींमुळे बेकायदेशीर होर्डिंग, विद्रूपीकरण, निश्चित केलेल्या वेळेनंतरही प्रचार, अधिक वाहनांचा वापर यावर निर्बंध आणणे शक्य झाल्याची माहिती आयोगाचे सहसंचालक अनुज चांडक यांनी दिली आहे.

दरम्यान, राजकीय पक्षांकडूनही एका महिन्यात आयोगाकडे तब्बल 200 तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये सर्वाधिक 59 तक्रारी काँग्रेसने, तर 51 तक्रारी भाजपने केल्या आहेत. त्यापैकी अनुक्रमे 51 आणि 38 तक्रारींवर कारवाईही करण्यात आली आहे. इतर पक्षांकडून 90 तक्रारी करण्यात आल्या असून, त्यापैकी 80 तक्रारींवर कार्यवाही करण्यात आल्याची माहिती आयोगाकडून देण्यात आली.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT