Congress Sarkarnama
देश

Lok Sabha Election 2024 : उद्या मतदान अन् आपल्याच उमेदवाराविरोधात मतं मागण्याची काँग्रेसवर वेळ

Congress News : राजस्थानातील बांसवाडा-दुंगरपूर मतदारसंघ काँग्रेसने मित्रपक्षाला सोडला आहे. पण त्यापुर्वीच काँग्रेसच्या उमेदवाराने अर्ज दाखल केला होता. पण त्यांनी हा अर्ज मागे न घेतल्याने पेच निर्माण झाला आहे.  

Rajanand More

New Delhi News : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) दुसऱ्या टप्प्यातील मतदान शुक्रवारी होणार आहे. या टप्प्यातील मतदारसंघांमध्ये प्रचाराच्या तोफाही थंडावल्या आहेत. राजस्थानमधील काही मतदारसंघांमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत होत आहे. तर एका मतदारसंघात काँग्रेस, भाजप आणि काँग्रेसचा मित्रपक्ष अशी तिरंगी लढत होत आहे. या मतदारसंघात काँग्रेसला आपल्याच पक्षाच्या उमेदवाराविरोधात मतं मागण्याची वेळ आली आहे. पंजासमोरील बटण दाबू नका, असे आवाहन पक्षाचे नेते मतदारांना करत आहेत.

राजस्थानातील (Rajasthan) बांसवाडा-डुंगरपूर मतदारसंघात उमेदवारीवरून मोठे नाट्य घडले आहे. राज्यात काँग्रेसने (Congress) अखेरच्या क्षणी भारत आदिवासी पक्षासोबत आघाडी केली. पण त्याआधीच काँग्रेसने या मतदारसंघातील आपला उमेदवार जाहीर केला होता. अरविंद दामोर यांनी पक्षाच्या एबी फॉर्मसह उमेदवारी अर्जही दाखल केला. तसेच भारत आदिवासी पक्षाचे (BAP) उमेदवार राजकुमार रौत यांनीही अर्ज दाखल केला होता.

आघाडीचा निर्णय उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या एक दिवस आधी झाला. काँग्रेसकडून रौत यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दामोर यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगितले. पण अर्ज मागे घेण्यासाठी ते निवडणूक कार्यालयात फिरकलेच नाहीत. वेळ उलटून गेल्यानंतरच ते प्रकटले. (Latest Political News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दामोर यांच्या या भूमिकेमुळे या मतदारसंघात आता तिरंगी लढत होत आहे. मात्र, काँग्रेसचे नेते पदाधिकारी दामोर यांच्याविरोधात मतं मागत आहेत. त्यामुळे या मतदारसंघाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. काँग्रेसकडून रौत यांचा प्रचार केला जात असून पंजासमोरील बटण दाबू नका, असे आवाहन मतदारांना करावे लागत आहे.

काँग्रेसचे नेते सांगत आहेत की, आम्ही दामोर यांना मतदान न करण्याचे आवाहन मतदारांना करत आहोत. पक्षाने भारत आदिवासी पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. पक्षाकडून आलेल्या आदेशानुसार आम्ही लोकांना आवाहन करत आहोत. दामोर यांनी मात्र काँग्रेसची मतं आपल्यालाच मिळणार असल्याचा दावा केला आहे. या मतदारसंघात उद्या मतदान होत आहे. त्यामुळे काँग्रेसची मतं नेमकी कुणाला मिळणार, मतविभाजनाचा भाजपला फायदा होणार का, या प्रश्नाचे उत्तर चार जूनला मिळणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT