Afzal Ansari, Ajay Rai Sarkarnama
देश

Lok Sabha Election 2024 : कट्टर दुश्मन येणार एकत्र; भावाची हत्या करणाऱ्याच्याच भावाचा प्रचार करण्याची वेळ...

Rajanand More

Uttar Pradesh News : मागील अनेक दिवसांपासून काँग्रेस आणि समाजवादी पक्षात लोकसभा निवडणुकीसाठी आघाडी होणार की नाही, याचीच चर्चा झडत होती. अखेर काल दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी आघाडीवर शिक्कामोर्तब केले आणि चर्चेवर पडदा पडला. काँग्रेसच्या वाट्याला 17 जागा आल्या असून, समाजवादी पार्टी 63 जागा लढवणार आहे. त्यापैकी गाजीपूर या मतदारसंघात दोन्ही पक्षांमधील नेत्यांचे मनोमिलन होणार का, याची उत्सुकता आता वाढली आहे. (Lok Sabha Election 2024)

गाजीपूर मतदारसंघ सपाकडे (Samajwadi Party) असून, अफजल अन्सारी यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. ते गँगस्टर मुख्तार अन्सारीचे बंधू आहेत. उत्तर प्रदेश काँग्रेसचे (Congress) अध्यक्ष अजय राय यांचे बंधू अवधेश राय यांच्या हत्येचा आरोप अन्सारी बंधूंवर आहे. मुख्तारच्या विरोधार राय यांनी न्यायालयीन लढाही दिला आहे. दोघांमधील दुश्मनी जगजाहीर आहे.

मुख्तार अन्सारी, अफजल अन्सारी आणि त्यांच्याशी संबंधित लोकांवर हत्या करणे, दहशत पसरवणे आदी गंभीर आरोप राय यांनी यापूर्वी अनेकदा केले आहेत. अवधेश राय हत्याकांड प्रकरणी मुख्तार अन्सारीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर अजय राय यांनी कोर्टासमोर डोकं टेकवलं होतं. अवधेश यांची 3 ऑगस्ट 1991 रोजी हत्या झाली होती. त्याचा निकाल तब्बल 32 वर्षांनी लागला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राय यांचे मूळ गाव गाजीपूरमधील मळसा हे आहे. पण अनेक वर्षांपासून वाराणसीमध्ये राहतात. सध्या ते उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. पक्षाने सपासोबत आघाडी केल्याने राज्यात सपाच्या मतदारसंघातही राय यांना प्रचाराला उतरावे लागणार आहे. गाजीपूरमध्येही अन्सारी यांना मदत करावी लागणार आहे. त्यामुळे राय आणि अन्सारी एका मंचावर येणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

दरम्यान, वाराणसी मतदारसंघ पुन्हा आपल्याकडे खेचून आणण्यात अजय राय यांना यश आले आहे. या मतदारसंघात समाजवादी पक्षाने उमेदवार घोषित केला आहे. अंतिम टप्प्यात झालेल्या चर्चेनंतर सपाने हा मतदारसंघ काँग्रेसला दिला आहे. त्यामुळे या मतदारसंघातून पुन्हा एकदा अजय राय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात उभे राहणार का, याबाबतही जोरदार चर्चा आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT