Amit Shah, Rahul Gandhi Sarkarnama
देश

Modi Government : लोकसभेत बॅकफुटवर गेलेल्या मोदी सरकारच्या हाती ‘बॉम्ब’; राहुल गांधींचा विश्वासू नेता शहांच्या जाळ्यात अडकणार?

Gaurav Gogoi controversy : गौरव गोगोई यांनी डिसेंबर २०१३ मध्ये लग्नापूर्वी गुप्तपणे पाकिस्तानचा दौरा केला होता. याबाबत आसाम पोलिसांनी काहीच माहिती नव्हते, असा दावा हिमंता बिस्वा सरमा यांनी केला आहे.

Rajanand More

Modi government Lok Sabha : मागील आठवडाभर लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांच्या पुस्तकातील मजकुरावरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला होता. त्यावरून लोकसभेतील वातावारण चांगलेच तापले होते. याप्रकरणात मोदी सरकारला बॅकफुटवर जावे लागले होते. मोदींना भाषणही करता आले नाही. आता मात्र मोदी सरकारच्या हाती जणू काँग्रेसविरोधात बॉम्ब लागला आहे.

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी रविवारी पत्रकार परिषद घेत काँग्रेसच्या बड्या नेत्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. त्यांनी काँग्रेसचे खासदार व लोकसभेतील उपनेते गौरव गोगोई आणि त्यांच्या पत्नी एलिझाबेथ यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. पाकिस्तानी एजंट अली तौकीश शेखसोबत त्यांचे जवळचे संबंध असल्याचा धक्कादायक आरोप त्यांनी केला आहे.

एलिझाबेथ यांना शेखने पाकिस्तानी फर्ममध्ये नोकरी दिली होती. त्यानंतर त्यांना भारतात पाठविले. या कामाचे वेतन शेखकडूनच एलिजाबेथ यांना मिळत होता. भारताशी संबंधित गोपनीय माहिती गोळा करून त्या शेखला देत होत्या, असा धक्कादायक आरोप सरमा यांनी केला आहे. शेख हा २०१० ते २०१३ दरम्यान १३ वेळा भारतात येऊन गेला, असेही त्यांनी सांगितले.

गौरव गोगोई यांनी डिसेंबर २०१३ मध्ये लग्नापूर्वी गुप्तपणे पाकिस्तानचा दौरा केला होता. याबाबत आसाम पोलिसांनी काहीच माहिती नव्हते. दहा दिवसांच्या मुक्कामानंतर भारतात आल्यानंतर त्यांनी संसदेत संरक्षण उपकरणे आणि अणुऊर्जेशी संबंधित प्रश्न विचारले होते. त्यांच्या निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात पत्नीच्या पाकितानी बँक खात्याबाबत माहिती देण्यात आली नाही. वेतनासाठी एफसीआरएच्या नियमांना बगल देण्यात आली. एलिझाबेथ या पाकिस्तानला विमानाऐवझी अटारी सीमेवरून जात होत्या, असा दावा सरमा यांनी केला आहे.

ब्रिटिश नागरिक असलेल्या एलिझाबेथ गोगोई आणि पाकिस्तानी नागरिक असलेल्या शेख यांनी भारतविरोधी कट रचल्याचा गंभीर आरोपही सरमा यांनी केला आहे. त्याची माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाला दिली जाईल. केंद्रीय तपास यंत्रणांकडून त्याचा तपास होईल, असेही सरमा यांनी स्पष्ट केले आहे.

आसाममध्ये पुढील काही महिन्यांत विधानसभेची निवडणूक आहे. गोगोई हे आसाम काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असून लोकसभेतही महत्वाच्या पदावर आहेत. त्यामुळे सरमा यांच्या आरोपांमुळे आता सोमवारी लोकसभेत भाजपकडून काँग्रेसविरोधात मोर्चा उघडला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेस बॅकफुटवर जाऊ शकते. काँग्रेसच्या विरोधाची धार कमी करण्यासाठी भाजपच्या हाती गौरव गोगोई यांच्या रुपाने मोठा मुद्दा लागला आहे.   

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT