Amit Malviya, Adv Asim Sarode Sarkarnama
देश

Lok Sabha Security Breach : घुसखोरीमागे इंडिया आघाडी? असीम सरोदे यांचे नाव घेत अमित मालवीयांनी साधला निशाणा

India Alliance : ललित झा आणि तृणमूलचे नेते तापस रॉय यांचे फोटो व्हायरल...

Rajanand More

Amit Malviya : लोकसभेतील घुसघोरीच्या कटातील मास्टरमाईंड ललित झा याचे पश्चिम बंगाल कनेक्शन समोर आले आहे. भाजप नेत्यांनी ललित आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्याचे फोटो व्हायरल केले आहेत. त्यानंतर भाजपच्या आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी थेट पुण्यातील अॅड. असीम सरोदे यांचे नाव घेत घुसघोरीचा संबंध इंडिया आघाडीशी जोडला आहे. काँग्रेसचा आरोपींशी असलेल्या संबंधांची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. 

पश्चिम बंगाल (West Bengal) भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुकांता मुजुमदार (Sukanta Mujumdar) यांनी गुरूवारी ललित झा आणि तृणमूलचे नेते तापस रॉय (Tapas Roy) यांचे फोटो ट्विट करत चौकशीची मागणी केली आहे. त्यांच्यासह अमित मालवीय (Amit Malviya) यांनीही इंडिया आघाडीचा (India Alliance) आरोपींशी संबंध असल्याचा थेट आरोप केला आहे. याबाबतचे ट्विट मालवीय यांनी केले असून त्यामध्ये असीम सरोदे यांचा उल्लेख करत काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

आरोपी अमोल शिंदे यांची न्यायालयात बाजू मांडणार असल्याचे सरोदे यांनी जाहीर केले आहे. त्यावरून मालवीय यांनी म्हटले आहे की, घुसखोरी प्रकरणातील आरोपी आणि काँग्रेसमधील संबंध समोर येत आहेत. असीम सरोदे हे राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सक्रीयपणे सहभागी होते. काँग्रेसचा आरोपींशी असललेल्या संबंधांची चौकशी करायला हवी.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

असीम सरोदे यांची केवळ काँग्रेसशी जवळीक नाही, तर ते उध्दव ठाकरे गटाचे वकीलही आहेत. आता ते संसदेत घुसखोरी करणाऱ्यांचे संरक्षण करणार आहेत. आरोपींची विचारधारा काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि टीएमसी व इतरांशी मिळतीजुळती आहे. आरोपी हे इंडिया आघाडीशी संबंधित असून वकील त्यांना वाचविण्यासाठी पुढे येत आहेत, हा इकोसिटीमचा भाग आहे. त्यामुळे संसदेच्या सुरक्षा भेदण्यामागे इंडिया आघाडीच असल्यामागे कोणतीही शंका नाही, असा थेट आरोपी मालवीय यांनी केला आहे.

दरम्यान, अॅड. असीम सरोदे यांनी अमोलच्या बाजूने लढण्याची घोषणा केली आहे. याविषयी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, संसद ही आपला अभिमानाचे प्रतिक आहे. निवडून आलेले सर्व लोकप्रतिनिधी तिथे बसतात. त्यामुळे अमोल शिंदे व इतरांनी केलेले कृत्य चुकीचेच आहे. त्यासाठी त्यांना शिक्षाही व्हायला हवी. पण त्यांच्यावर ज्या कायद्यांअंतर्गत गुन्हे दाखल कऱण्यात आले आहेत, ते चुकीचे आहे.

चुकीच्या कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आल्याने मी अमोल शिंदे याच्यासोबत असून त्याची कायदेशीर बाजू मांडण्यात मदत करणार आहे. एफआयआरमध्ये लावण्यात आलेली कलमे योग्य आहेत की नाही, हे मी पाहीन. अमोल शिंदे आणि इतर जण बेरोजगारी आणि महागाईचा मुद्दा पुढे आणण्याचा प्रयत्न करत होते, असे अॅड. सरोदे यांनी स्पष्ट केले.

(Edited By - Rajanand More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT