Mumbai News : भारतीय जनता पक्षाचे आमदार नीतेश राणे यांनी आज विधानसभेत एक बॉम्ब फोडला. ठाकरे गटाचे नाशिक शहरप्रमुख सुधाकर बडगुजर यांचा मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी सलीम कुत्ता याच्याबरोबर पार्टीतील एक फोटो विधानसभेत झळकवला. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. सलीम कुत्ता याचे मूळ नाव काय, त्याला सलीम कुत्ता हे नाव कसं पडलं, हे जाणून घेऊया. (Who is Salim Kutta whose photo was shown by Nitesh Rane in the Assembly?)
मुंबईमध्ये १९९३ मध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले होते. त्या बॉम्बस्फोटाचा प्रमुख गुन्हेगार दाऊद इब्राहिम याचा सलीम कुत्ता साथीदार होता. तो मूळचा उत्तर प्रदेशमधील नजीबाबादच्या कल्हेडी गावातला. त्याचे मूळ नाव मोहम्मद सलीम शेख आहे. मात्र, तो कुत्र्यासारखा गुरगुरायचा म्हणून गुन्हेगारी जगात त्याला सलीम कुत्ता हे नाव पडले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्यासाठी दाऊदने दुबईत जानेवारी १९९३ मध्ये बैठक घेतली होती. त्यात सलीम कुत्ता सामील होता. सलीम कुत्ता या बॉम्बस्फोटांसाठी टायगर मेमनसोबत होता. एके ४७ आणि इतर हत्यारे पुरवण्याचे काम तो करायचा. या साखळी बॉम्बस्फोटांमध्ये २५७ लोकांचा बळी गेला, तर १४०० हून अधिक जखमी झाले होते.
मुंबईतील जेजे रुग्णालयात १२ जुलै १९९२ रोजी केलेल्या बेछूट गोळीबारातही कदीरसोबत सलीम कुत्ता होता. गवळी टोळीच्या शैलेश हळदणकरच्या हत्येसाठी हा गोळीबार होता. मुंबईतील बॉम्बस्फोटांनंतर गुजरात पोलिसांनीही सलीम कुत्ताला अटक केली होती. त्यानंतर सलीमच्या मेहुण्याच्या घरातून एके-४७ हस्तगत केली होती.
नजीबाबाद भागातील कल्हेडी गावात राहणारा सलीम कुत्ता हा दाऊद इब्राहिम टोळीशी जोडला गेला होता. तो आपल्या गावात आम्ही मुंबईत व्यापार करण्यासाठी जातो, असे सांगून मुंबईत येऊन दाऊद इब्राहीम टोळीबरोबर काम करत होता. या टोळीशी संबंधित इतर काही लोकही त्याचे नातेवाईक होते.
दाऊदने भारत सोडल्यानंतर त्याच्या टोळीचा सर्व कारभार दाऊदची बहिण हसीना पारकर पाहायची. अरुण गवळीच्या टोळीने हसीना पारकरच्या पतीला मारले. त्याचा आरोप गवळी टोळीच्या शैलेश हळदणकर याच्यावर होता. हळदणकर हा वैद्यकीय उपचारासाठी जे जे रुग्णालयात दाखल झाला होता. आपल्या भावजीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी दाऊदकडून हळदणकर याच्यावर १९९२ मध्ये हल्ला घडवला होता. अंडरवर्ल्ड गॅंगमध्ये त्यावेळी पहिल्यांदा एके-४७ चा वापर करण्यात आला होता. हळदणकर याच्यावर सलीम कुत्ता यानेच हल्ला घडवल्याचा आरोप होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.