Rahul Gandhi Sarkarnama
देश

Lok Sabha Winter Session 2024 : राहुल गांधींचं ट्विट अन् लोकसभेत हंगामा; कामकाज बुधवारपर्यंत स्थगित

Lok Sabha proceedings suspended until Wednesday after Rahul Gandhi's tweet: संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संभल जिल्ह्यातील हिंसाचाराच्या मुद्द्यावरून विरोधकांनी हंगामा केला.

Rajanand More

New Delhi : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरूवात झाली अन् तासाभरातच कामकाज दोन दिवसांसाठी स्थगित करण्याची वेळ आली. उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यात मशिदीच्या सर्वेक्षणानंतर झालेल्या हिंसाचारात तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यावरून लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी ट्विट करत सरकारवर निशाणा साधला. तर दुसरीकडे हा मुद्दा विरोधकांनी सभागृहात उपस्थित करून चर्चेची मागणी केली.

लोकसभेचे कामकाज सुरू होताच काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या खासदारांनी संभलमधील हिंसाचारावर चर्चा करण्याची मागणी केली. त्याचप्रमाणे उद्योगपती गौतम अदानी प्रकरणावर चर्चेची मागणी करण्यात आली. पण लोकसभा अध्यक्षांनी सुरूवातीला दुपारी बारा वाजेपर्यंत कामकाज स्थगित केले. पुन्हा कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधक अधिकच आक्रमक झाले. त्यानंतर तालिका अध्यक्षांनी बुधवारी सकाळी 11 वाजेपर्यंत कामकाज स्थगित केले.

काय म्हटले राहुल गांधी?

संभल हिंसाचारावर राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटले आहे की, संभलमध्ये झालेल्य वादात राज्य सरकारची पक्षपाती आणि अतिघाईची भूमिका दुर्देवी आहे. सर्वांची बाजू ऐकून न घेता प्रशासनाने असंवेदनशीलपणे कारवाई करून वातावरण बिघडवले. याला थेट भाजप सरकार जबाबदार असल्याची टीका राहुल यांनी केली आहे.

भाजप सत्तेचा उपयोग हिंदू-मुस्लिम समाजात दरी आणि भेदभाव निर्माण करण्यासाठी करत आहे. हे राज्याच्या आणि देशाच्याही हिताचे नाही. यामध्ये सुप्रीम कोर्टाने तातडीने हस्तक्षेप करून न्याय द्यावा, अशी मागणीही राहुल गांधींनी केली आहे. सर्वांनी शांतता राखावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

काय घडलं संभलमध्ये?

संभल जिल्ह्यातील शाही जामा मशिदीचा सर्व्हे सुरू असताना रविवारी मोठा हिंसाचार झाला. यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला असून 20 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. कोर्टच्या आदेशानुसार सर्व्हे सुरू असताना स्थानिकांनी विरोध केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी गोळीबार केला, तर स्थानिकांकडून दगडफेक करण्यात आली.

दरम्यान, प्रशासनाने संभलमधील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली असून सोमवारी इयत्ता बारावीपर्यंतच्या शाळाही बंद ठेवण्यात आल्या आङेत. जिल्ह्याबाहेरील लोकांनाही 30 तारखेपर्यंत बंदी घालण्यात आल्याने जिल्ह्यात तणावाचे वातावरण आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT