Anurag Thakur, Rahul Gandhi Sarkarnama
देश

Rahul Gandhi Vs Anurag Thakur : अनुराग ठाकुरांनी शिवी दिली! राहुल गांधी संतापले, लोकसभेत मोठा गदारोळ

Lok Sabha Session Caste Based Census : लोकसभेत जातनिहाय जनगणनेवरून अनुराग ठाकूर यांनी केलेल्या विधानावरून मोठा गदारोळ झाला.

Rajanand More

New Delhi : अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान भाजपचे खासदार अनुराग ठाकूर यांनी मंगळवारी जातनिहाय जनगणनेवरून वादग्रस्त विधान केले. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर बोलताना त्यांनी जातीवाचक टीका केल्याने मोठा गदारोळ झाला.

राहुल गांधी यांनी लोकसभेतील आपल्या भाषणात जातनिहाय जनगणनेवरून मोदी सरकारवर टीका केली होती. तसेच या सभागृहात आम्ही जातनिहाय जनगणनेचा निर्णय़ करून दाखवू, असे आव्हान सरकारला दिले होते. त्याच मुद्यावरून ठाकूर यांनी निशाणा साधला.

ज्यांना आपली जात माहिती नाही, ते जातनिहाय जनगणनेची मागणी करत असल्याचे विधान ठाकूर यांनी केले. त्यावर राहुल यांच्यासह काँग्रेस व इतर विरोधी पक्षातील सदस्यांनीही आक्षेप घेतला. हे विधान मागे घेत ठाकूर यांनी माफी मागावी, अशी मागणी विरोधकांनी केली.

काँग्रेसचे काही खासदार अध्यक्षांसमोरील मोकल्या जागेत जाऊन घोषणाबाजी करू लागले. पण त्यानंतरही ठाकूर आपल्या विधानावर अडून होते. मी कुणाचेही नाव घेतले नाही, असे ते म्हणाले. त्यानंतर पीठासीन अधिकाऱ्यांनी राहुल यांना बोलण्याची परवानगी दिली.

अनुराग ठाकूर यांनी आपल्याला शिवी दिल्याचे सांगत राहुल म्हणाले, अनुराग ठाकूर यांनी माझा इन्सल्ट केला. दलित, ओबीसींवर बोलणाऱ्यांना शिवी खावीच लागते. पण मला कितीही शिव्या दिल्या तरी मी मागे हटणार नाही. जातनिहाय जनगणना केल्याशिवाय थांबणार नाही, असे राहुल यांनी ठणकावून सांगितले. ठाकूर यांची माफी मला नकोय, असेही राहुल म्हणाले.

अखिलेश यादव यांनीही अनुराग ठाकूर यांच्यावर निशाणा साधला. ते माजी केंद्रीय मंत्री आहेत. ते एखाद्या सदस्याची जात कशी काढू शकतात, असा सवाल अखिलेश यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांना आपला राग अनावर झाला होता. त्यानंतर पीठासीन अधिकाऱ्यांनी ठाकूर यांच्या भाषणातील वादग्रस्त शब्द सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकले जाईल, तसेच कारवाई करण्याबाबतही त्यांनी विरोधकांना आश्वासन दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT