PM Narendra Modi, Rahul Gandhi Sarkarnama
देश

Narendra Modi Vs Rahul Gandhi : राहुल गांधींनी पहिल्या 7 मिनिटांतच मोदींविरोधात टाकला डाव! काय घडलं लोकसभेत?

Lok Sabha Session Live Parliament Constitution : 18 व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सदस्यत्वाची शपथ घेतली. यावेळी विरोधकांनी घोषणाबाजी केली.

Rajanand More

New Delhi : लोकसभा निवडणुकीत 400 पारची डरकाळी फोडून ही निवडणूक एकहाती जिंकण्याच्या इराद्याने निघालेल्या मोदी-शाहांना विरोधकांनी संविधानच्या मुद्यावरून घेरले. प्रचार ऐन रंगात असतानाच संविधान बदलण्याचा मुद्दा प्रचंड तापवून विरोधकांनी विशेषत: राहुल गांधींनी भाजप नेत्यांना सळो की पळो केले. त्याचे पडसाद सोमवारी लोकसभेतही उमटले.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या एक-दोन टप्प्यात एकतर्फी वाटणारी निवडणूक निकालात मात्र विरोधकांच्या बाजूने झुकली. या निवडणुकीत मतदारांनी सत्तेसाठी राहुल यांच्यावर पूर्ण विश्वास दाखवला नाही, मात्र त्यांच्या संविधान बदलण्याच्या मोदीविरोधी प्रचाराचा मुद्दा चांगलेच गंभीरतेने घेतल्याचे दिसते. संविधान बदलण्याचे नॅरेटिव्ह बदलण्यात अपयश आल्याचे भाजप नेत्यांनी बोलूनही दाखवले.

एनडीएची सत्ता आल्यानंतर नरेंद्र मोदींनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. तर सोमवारी लोकसभेत सदस्यत्वाची शपथ घेण्याआधीच विरोधी बाकांवर बसलेल्या राहुल गांधींनी पहिला डाव टाकला. मोदी शपथ घेण्यासाठी उठताच राहुल यांनी संविधानाची प्रत घेऊन हात उंचावला. अधिवेशनाचे कामकाज सुरू झाल्यानंतर पहिल्या सात मिनिटांतच या घडामोडी घडत होत्या.

विरोधी पक्षाच्या इतर काही सदस्यांनीही उभे राहून मोदींना संविधानाची प्रत दाखवली आणि घोषणाही दिल्या. याचवेळी मग सत्ताधारी बाकांवरील सदस्यांनी मोदी-मोदी असा नारा देत विरोधकांना प्रत्युत्तर दिलं. काँग्रेसकडून राहुल यांना विरोधी पक्षनेता पद स्वीकारण्याचा ठराव पारित करण्यात आला आहे.

अद्याप राहुल यांनी त्याला होकार दिला नसला तरी सोमवारी त्यांनी मोदींना दिलेले आव्हान खूप काही सांगून गेले. त्यामुळे तेच विरोधी पक्षनेत्याची भूमिका बजावणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे.

दरम्यान, विरोधकांनी अधिवेशनाला सुरूवात होण्यासाठी संसदेच्या आवारात संविधानाची प्रत हातात घेऊन आंदोलन केले. यामध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जून खर्गे यांच्यासह विरोधी पक्षांतील अनेक खासदार सहभागी झाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT