Vishal Patil Sarkarnama
देश

Vishal Patil : पत्नी चित्रपटाला घेऊन गेली अन्..! विशाल पाटलांचं लोकसभेत तडाखेबंद भाषण

Rajanand More

New Delhi : सांगली लोकसभा मतदारसंघाचे खासदार विशाल पाटील यांनी सोमवारी लोकसबेत तडाखेबंद भाषण केले. अर्थसंकल्पावरील भाषणात त्यांनी ये तो अभी ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है, या पतंप्रधान नरेंद्र मोदींच्या विधानाचाही समाचार घेतला.

विशाल पाटील यांनी अर्थसंकल्पावरून सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, ट्रेलर आणि पिक्चरच्या गप्पांची भीती वाटते. परवा बायको म्हणाली, एका चित्रपटाचा ट्रेलर पाहिलाय. आणि चित्रपट दाखवायला मला घेऊन गेली. ट्रेलर पाहून चित्रपट पाहायला तर गेलो पण तो बोअर असल्याने अर्ध्या तासात बाहेर आलो.

सरकारचेही असेच आहे. हे ट्रेलर तर चांगला बनवतात. पण त्यांच्याकडून चित्रपट बनतच नाही. कारण दिग्दर्शकातच प्रॉब्लेम आहे. आता तर ट्रेलरही फ्लॉप झाला आहे, असा हल्लाबोल पाटील यांनी केला. अर्थमंत्र्यांनी आसाम आणि बिहारमधील पूराचा उल्लेख केला. आंध्र प्रदेशातील अमरावतीला निधी दिला. पण महाराष्ट्रातील पूर, अमरावतीचा उल्लेख केला नाही. बिहारमधील सिंचनासाठी निधी दिल्याचे सांगण्यात आले. पण सांगलीतील प्रकल्पांना निधी द्यावासा वाटला नाही, असे पाटील म्हणाले.

भारतातील टॅक्समधील 26 टक्के हिस्सा महाराष्ट्र देतो. देशाची पाच ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. पण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन झाल्याशिवाय ते शक्य होणार नाही. महाराष्ट्राच्या विकासाशिवाय देशाचा विकास शक्य नाही. महाराष्ट्र गीतातील दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढ़ळाच्या घामाने भिजला, देशगौरवासाठी झिजला, दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा, या ओळी बोलून दाखवत विशाल पाटील यांनी सरकारला महाराष्ट्राचे महत्व सांगितले.

दिल्लीचे तख्त सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी महाराष्ट्र घेत होता, घेत आहे आणि यापुढेही घेत राहील, असे पाटील यांनी ठणकावून सांगितले. आर्थिक, सामाजिक, साहित्यिक असो किंवा राजकीय असो. या सरकारला सुरक्षित ठेवण्याचे कामही महाराष्ट्राने त्यांना 17 खासदार देऊन केले आहे. त्यांच्याकडे पाहून तरी महाराष्ट्राला काही द्यायला हवे होते. त्यांना भीती आहे मतदारसंघात जाऊन काय उत्तर देणार, असा टोला पाटलांनी लगावला.

कुबड्यांच्या आधारे चालणार हे सरकार आपला देश बुडवेल, अशी भीती वाटते. महागाई रोखण्यासाठी सरकारने काहीच केले नाही. भूमिहीन शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेत समाविष्ट केले नाही. खतांवरील जीएसटी माफ केला नाही, यांसह त्यांनी अनेक मुद्यांवर सरकारला धारेवर धरले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT