Parliament Winter Session 2023 Sarkarnama
देश

Lok Sabha Winter Session : 'इंडिया'ला मोठा धक्का; अधीर रंजन चौधरींसह लोकसभेचे 33 खासदार निलंबित

Rajanand More

Parliament Security Breach : लोकसभेतील घुसखोरी प्रकरणावरून सोमवारीही विरोधकांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात गोंधळ घातला. त्यानंतर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी 33 खासदारांना अधिवेशनाचे कामकाज संपेपर्यंत निलंबित केले आहे. त्यामुळे विरोधकांना मोठा धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वी लोकसभेतील 13 आणि राज्यसभेतील एका खासदाराचे निलंबन करण्यात आले आहे.

निलंबित करण्यात आलेल्या खासदारांमध्ये काँग्रेसचे (Congress) अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chowdhury), डीएमकेचे टी आर बालू, दयानिधी मारन, तृणमूलच्या सौगत रॉय यांचाही समावेश आहे. सोमवारी दोन्ही सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरूवात केली. त्यामुळे सरूवातीला दुपारी बारा वाजेपर्यंत कामकाज तहकूब करावे लागले. (Parliament Winter Session)

दुपारी बारा वाजता कामकाज सुरू झाल्यानंतर पुन्हा विरोधकांकडून घोषणाबाजी सुरू झाली. त्यामुळे दुसऱ्यांदा कामकाज तहकूब करण्याची वेळ आली. ओम बिर्ला (Om Birla) यांनी विरोधकांना या प्रकरणाचे राजकारण न करण्याचे आवाहन करत शांत राहण्यास सांगतिले. पण विरोधी बाकांवरील सदस्य आक्रमक असल्याने दुपारी दोन नंतर दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आले.

विरोधी बाकांवरील खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी सभागृहात येऊन भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा अध्यक्षांनी 33 खासदारांना अधिवेशनाचे कामकाज संपेपर्यंत निलंबित केले. तर तिघांच्या निलंबनाचा प्रस्ताव समितीकडे पाठविण्यात आला आहे. ही समिती याबाबतचा निर्णय घेणार आहे.

दरम्यान, लोकसभेत 13 डिसेंबरला दोन तरुणांनी घुसखोरी केली होती. तर संसदेबाहेर दोघांनी घोषणाबाजी करत स्मोक कॅंडल जाळण्यात आल्या होत्या. याप्रकरणी आतापर्यंत सहा जणांना अटक कऱण्यात आली आहे. हिवाळी अधिवेशनाचे कामकाज सुरू असतानाच ही घुसखोरी झाल्याने सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

विरोधकांकडून त्यावरून सरकारला धारेवर धरले जात आहे. गोंधळामुळे 14 डिसेंबरला लोकसभेचे 13 आणि राज्यसभेच्या एका खासदारांना निलंबित करण्यात आले होते. आता एकाच दिवशी 33 सदस्यांना निलंबित करण्यात आल्याने विरोधकांना मोठा धक्का बसला आहे.

(Edited By - Rajanand More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT