Supriya Sule  Sarkarnama
देश

Lok Sabha update : साधना महाजन, रजनी सावकारे, अपर्णा फुंडकर... निवडणुकीत काय-काय घडलं? संसदेत सुप्रिया सुळेंनी यादीच आणली...

Supriya Sule praises Nilesh Rane : पंतप्रधानांना उद्देशून सुप्रिया सुळे म्हणाल्या, तुम्ही देशाला एक दिशा दाखवत असताना तुमच्याच पक्षाचे सरकार महाराष्ट्रात वेगळेच काहीतरी करत आहे.

Rajanand More

Maharashtra Elections update : नगरपंचायत व नगरपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रातील अभूतपूर्व गोंधळाचा मुद्दा आज संसदेत निघाला. शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी भाजप कार्यकर्त्याच्या घरात पकडलेल्या कॅशवरून राज्याच्या राजकारणात मोठा गोंधळ उडाला होता. भाजप व शिवसेना आमनेसामने आले होते. राणेंच्या या कृतीचे आज संसदेतही पडसाद उमटले.

लोकसभेत आज निवडणूक सुधारणांवर चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना महाराष्ट्रातील निवडणुकीदरम्यान झालेल्या घडामोडींमधून भाजपवर जोरदार हल्ला चढविला. हे करताना त्यांनी निलेश राणेंचे कौतुकही केले.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, महाराष्ट्रात भाजपचे २८८ पैकी २०० आमदार निवडून आले. त्यानंतर झालेल्या पंचायत निवडणुकीत उमेदवारी अर्जात गडबड, माघारी घेण्यात गडबड नंतर आरक्षणात गडबड. त्यानंतर भाजपच्या मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या एका आमदाराने भाजपच्या एका नेत्याच्या घरातून कॅश पकडली. हे केवळ एक उदाहरण नाही.

पंतप्रधानांना उद्देशून त्या म्हणाल्या, तुम्ही देशाला एक दिशा दाखवत असताना तुमच्याच पक्षाचे सरकार महाराष्ट्रात वेगळेच काहीतरी करत आहे. नोटबंदी याच सभागृहात मंजूर झाली. काळापैसा काढू, हे म्हणाले होते. पण ही कॅश यांच्याकडे आहे. भाजपकडे हे पैसे कुठून आले? याची चौकशी कधी करणार? ईडी आणि सीबीआयकडून ही चौकशी व्हावी. हे खूप मोठे रॅकेट आहे, असे गंभीर आरोप सुप्रिया सुळे यांनी केले.

निलेश राणे यांचे कौतुकही सुप्रिया सुळे यांनी यावेळी केले. हे एक देशभक्तीचे उदाहरण असल्याचेही त्या म्हणाल्या. सत्तेत असूनही देशासाठी कॅश पकडली. भाजप काय करतंय, हे त्यांनी संपूर्ण जगाला दाखविले, खासदार सुळे लोकसभेत म्हणाल्या. यावेळी त्यांनी सत्ताधारी बाकांवर बसलेले शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांच्या नावांचा आवर्जून उल्लेखही केला.

भाजपचा परिवारवाद

सुप्रिया सुळे यांनी नगरपंचायत व नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या परिवारवादाचे उदाहरण सांगताना नगराध्यक्षपदी बिनविरोध निवडून आलेल्या मंत्र्यांच्या नातेवाईकांची यादीच वाचून दाखवली. साधना महाजन, रजनी सावकारे, अपर्णा फुंडकर, प्रियदर्शनी उके, प्रतिभा चव्हाण अशी नावे त्यांनी घेतली. इथे निवडणुका झाल्याच नाहीत. कुणाला अर्जही भरू दिले नाही. मंत्र्यांच्या पत्नी, बहीण, वहिनी असे सगळ्या आहेत. २५ ठिकाणी बिनविरोध निवडणूक कशी होऊ शकते, असे सुप्रिया सुळे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

महाराष्ट्रात इलेक्शन कमिशन नाहीच. त्यांनी मौनव्रत ठेवले आहे. महाराष्ट्राच्या निवडणुकीत हिंसा कधी झाली नाही. पण यावेळी बंदुकाही दाखविण्यात आल्या. गाड्या तोडण्यात आल्या. दगडफेक झाली. हे कोणते राज्य आहे, हे आहे का इलेक्शन?, असा सवाल सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT