Lok Sabha Speaker action : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मंगळवारी लोकसभेत जोरदार हंगामा झाला. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांच्या एका अप्रकाशित पुस्तकाचा संदर्भ देत त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना घेरण्याचा प्रयत्न केला होता. पण नियमांवर बोट ठेवत अध्यक्षांनी त्यांना रोखले. त्याचा प्रत्यय आजही लोकसभेत आला.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना राहुल गांधी यांनी आज पुन्हा चीनच्या घुसखोरीवरून पंतप्रधानांवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. यावेळी तालिका अध्यक्षांनी त्यांना केवळ राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलण्यास सांगितले. काही मिनिटे त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा व इतर मुद्द्यांवर भाष्य करत पुन्हा नरवणे यांच्या पुस्तकातील संदर्भाकडे आले. त्यानंतर मात्र तालिका अध्यक्षांनी त्यांना बोलण्यापासून रोखले आणि अन्य सदस्यांना बोलण्यास सांगितले.
तालिका अध्यक्षांच्या या भूमिकेमुळे संतापलेल्या काँग्रेसच्या खासदारांनी त्यांच्या दिशेने कागद फेकत घोषणाबाजी केली. त्यामुळे सभागृहाचे कामकाज तीन वाजेपर्यंत तहकुब करण्यात आले. कामकाजाला पुन्हा सुरूवात झाल्यानंतर काँग्रेसच्या आठ खासदारांना निलंबित करण्याचा प्रस्ताव सरकारकडून लोकसभेत मांडण्यात आला. त्यामध्ये महाराष्ट्रातील खासदार प्रशांत पडोळे, अमरिंदर सिंग राजा वारिंग, गुरदीप सिंग औजला, हिबी ईडन, मणकिम टागोर, किरण रेडडी, वेंकट रमण आणि डीन कोरियाकोस यांचा यामध्ये समावेश आहे.
प्रस्ताव मंजूर झाल्यामुळे या आठ खासदारांना आता संपूर्ण अधिवेशनाच्या काळात लोकसभेच्या कामकाजात सहभागी होता येणार नाही. प्रस्ताव मंजूर झाल्यानंतरही अध्यक्षांच्या दिशेने कागद फेकण्यात आले. त्यानंतर तालिका अध्यक्षांनी सभागृहाचे कामकजा दिवसभरासाठी तहकूब केले. खासदारांच्या निंलबनाविरोधात राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाखाली संसदेच्या आवारात निदर्शने करण्यात आली.
दरम्यान, राहुल गांधी यांच्या भाषणावरून सलग दुसऱ्या दिवशी लोकसभेत गदारोळ झाला. काल पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राजनाथ सिंह हे लोकसभेत उपस्थित होते. आज राजनाथ सिंह यांची राहुल यांच्या भाषणावेळी सभागृहात उपस्थिती होती. राहुल यांच्या भाषणादरम्यान सत्ताधारी बाकांवरी खासदारांकडूनही वारंवार आक्षेप घेण्यात आले. त्यामुळे दोन्ही बाजुकडील खासदार आमनेसामने उभे ठाकल्याची दिसून आले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.