सध्याच्या महागाईच्या काळात महिलांसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय सी जोसेफ यांनी सोमवारी विधानसभेत महिलांसाठी महत्त्वाच्या कल्याणकारी योजनांची घोषणा केली. यामध्ये पात्र कुटुंबांना दरवर्षी 3 मोफत LPG सिलिंडर देण्याची घोषणा करण्यात आली आहे. वाढत्या गॅसच्या किमतीमुळे घरखर्चाचे गणित बिघडलेल्या कुटुंबांना या निर्णयामुळे मोठा आर्थिक दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री थलपती विजय यांनी जाहीर केलेल्या 'अन्नपूर्णी सुपर सिक्स' योजनेअंतर्गत ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबांना वर्षाला 3 LPG सिलिंडर मोफत मिळणार आहेत. ही योजना पुढील वर्षी जानेवारी महिन्यात पोंगलच्या मुहूर्तावर सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
या योजनेचा लाभ घेणाऱ्या कुटुंबांना सिलिंडर खरेदी केल्यानंतर त्यासाठी खर्च झालेली रक्कम सरकारकडून थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांना LPG सिलिंडर खरेदीसाठी होणाऱ्या खर्चातून मोठा दिलासा मिळणार आहे.
सरकारच्या अंदाजानुसार, 'अन्नपूर्णी सुपर सिक्स' योजनेचा फायदा सुमारे 1.3 कोटी कुटुंबांना होऊ शकतो. या योजनेसाठी राज्य सरकारकडून दरवर्षी जवळपास 4,000 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. गॅसच्या वाढत्या किमती आणि आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे नागरिकांवर वाढत असलेल्या आर्थिक दबावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री विजय यांनी विधानसभेत सांगितले.
यावेळी महिलांसाठीच्या 'वेट्री पयानम' योजनेतही मोठा बदल करण्यात आला आहे. आतापर्यंत काही सरकारी बस सेवांमध्ये महिलांना मोफत प्रवासाची सुविधा मिळत होती. आता या योजनेची व्याप्ती वाढवून एक्स्प्रेस, एलएसएस, डिलक्स आणि आंतरजिल्हा सरकारी बस सेवांचाही त्यात समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे तृतीयपंथीयांनाही या मोफत प्रवास योजनेचा लाभ घेता येणार आहे.
एकीकडे 3 मोफत LPG सिलिंडर आणि दुसरीकडे महिलांसाठी मोफत बस प्रवासाच्या सुविधेचा विस्तार, यामुळे तामिळनाडूमधील महिलांना मोठा फायदा होणार आहे. सरकारच्या या घोषणेमुळे महिलांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.