LPG cylinder supply regulation india : इराण युध्दामुळे देशावर एलपीजी गॅस टंचाईचे संकट घोंघावत आहे. सरकारकडून देशात पुरेसा गॅस उपलब्ध असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात मात्र गॅस तुटवड्याचे परिणाम दिसू लागले आहे. प्रामुख्याने व्यावसायिक गॅस पुरवठा मंदावल्याने अनेक हॉटेल, खानावळींना त्याचा फटका बसत आहे. तसेच सरकारकडूनही काही नियम बदलले जात असल्याने ग्राहकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
मागील काही दिवसांपासून गॅस सिलिंडर मिळविण्यासाठी देशात बहुतेक ठिकाणी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागण्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ग्राहकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन सरकारकडून केले जात आहे. मात्र, सरकारच आता गॅसचा आणखी तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी प्रयत्नशील आहे. सरकारने आता आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे.
केंद्र सरकारच्या पेट्रोलियम मंत्रालयाने एक अधिसूचना जाहीर केली आहे. त्यानुसार पीएनजी म्हणजे पाईपद्वारे गॅस पुरवठा सुरू असलेल्या ग्राहकांना आता एलपीजी गॅस सिलिंडर मिळणार नाही. ज्या ग्राहकांकडे दोन्ही गॅस कनेक्शन आहेत, त्यांना आता एलपीजी गॅस सिलिंडर परत करावा लागणार आहे, असे अधिसूचनेमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
सरकारने कंपन्यांनाही आदेश दिले आहे. पीएनजी ग्राहकांना एलपीजी कनेक्शन देऊ नये, असे स्पष्ट आदेश सरकारने दिले आहेत. या नियमाची अंमलबजावणी शनिवारपासून (१४ मार्च) सुरू करण्यात आली आहे. एलपीजी ग्राहकांना पुरेसा गॅस पुरवठा उपलब्ध होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
सरकारने यापूर्वीही गॅस सिलिंडर मिळण्याचा कालावधी वाढविला आहे. ज्यादिवशी सिलिंडर ग्राहकांना मिळेल त्यानंतर २५ दिवसांनीच दुसरा सिलिंडर बुक करता येणार नाही. हा नियम शहरी भागासाठी आहे. तर ग्रामीण भागासाठी हा कालावधी ४५ दिवसांचा करण्यात आला आहे. वितरण प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठीही सरकारने गॅस वितरकांना सक्त ताकीद दिली आहे.
गॅस सिलिंडरचा काळा बाजार रोखण्यासाठी सरकारकडून यापूर्वीच आवश्यक वस्तू कायदा लागू करण्यात आला आहे. त्यानुसार ठिकठिकाणी प्रशासनाकडून कारवाई केली जात आहे. घरगुती गॅस सिलिंडरचा वापर व्यावसायिक कारणांसाठी होत असल्याने संबंधितांवर कारवाई करून सिलिंडर ताब्यात घेण्यात येत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.