Pradhuman Singh Tomar : मध्य प्रदेशात मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या मंत्रिमंडळाचा सोमवारी विस्तार झाला. यामध्ये 28 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामध्ये केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंच्या काही कट्टर समर्थकांचाही समावेश आहे. त्यापैकी एक नाव म्हणजे प्रद्युम्न सिंह तोमर. मात्र, मंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी त्यांनी गुडघे टेकवत शिंदे यांचे पाय धरल्याचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत.
शिंदे हे काँग्रेसमध्ये (Congress) असताना तत्कालीन मुख्यमंत्री कमलनाथ (Kamal Nath) यांच्या सरकारमध्येही तोमर मंत्री होते. त्यानंतर शिंदेंनी (Jyotiraditya Scindia) भाजपमध्ये प्रवेश केला आणि शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) मुख्यमंत्री झाले. त्यांच्या कॅबिनेटमध्येही तोमर यांना स्थान होते. राज्यात पुन्हा भाजपची (BJP) सत्ता आल्यानंतर शिंदे यांचे कट्टर समर्थक असलेले तोमर यांचे नाव पुन्हा मंत्रिमंडळात आले आहेत.
तोमर यांच्यासह कैलाश विजयवर्गीय, प्रल्हाद पटेल आदी ज्येष्ठ नेत्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. तत्पूर्वी शपथविधीच्या सोहळ्यासाठी येणाऱ्या शिंदेंच्या स्वागतासाठी तोमर भोपाळ विमानतळावर गेले होते. तोमर यांच्यासह इतर समर्थक आमदारही विमानतळावर होते. तोमर यांनी शिंदेंना पुष्पगुच्छ दिले आणि थेट गुडघे टेकवून त्यांच्या पायावर डोके टेकवले. त्यानंतर शिंदेंनी त्यांना उठवत गळाभेट घेतली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
तोमर हे ग्वाल्हेर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. आधी काँग्रेसच्या तिकीटावर आणि आता भाजपची उमेदवारी घेत ते विजयी झाले आहेत. शिंदे यांच्या पायावर डोके टेकवल्याचे त्यांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर टीका होत आहे. तर भाजप कार्यकर्त्यांकडून त्याचे समर्थन केले जात आहे.
दरम्यान, एकूण 28 मंत्र्यांपैकी 18 जणांनी कॅबिनेटची शपथ घेतली आहे. त्यामध्ये तोमर, तुलसी सिलावट, एल सिंह कसाना, नारायण सिंह कुशवाहा, विजय शाह, राकेश सिंह, प्रल्हाद पटेल, कैलाश विजयवर्गीय, करण सिंह वर्मा, संपतिया उईके, उदय प्रताप सिंह, निर्मला भूरिया, विश्वास सारंग, गोविंद सिंह राजपूत, इंदर सिंह परमार, नागर सिंह चौहान, चैतन्य कश्यप व राकेश शुक्ला यांचा समावेश आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.