Water in diesel vehicles : वाहनांमध्ये भरण्यात येणाऱ्या इंधनामध्ये भेसळीच्या तक्रारी अनेकदा येत असतात. सर्वसामान्य वाहन चालकांना या फटका सहन करावा लागतो. पण आता या भेसळीचा थेट मुख्यमंत्र्यांनाच झटका बसला आहे. त्यांच्या ताफ्यातील एक-दोन नव्हे तर तब्बल 19 वाहनांमध्ये डिझेल ऐवजी पाणी भरल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या वाहनांच्या ताफ्याबाबत हा प्रकार घडला आहे. शुक्रवारी रतलाममध्ये होणाऱ्या ‘एमपी राईज 2025’ या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उपस्थित राहणार होते. त्यांच्या ताफ्यासाठी इंदौर येथून 19 कार आणल्या जाणार होत्या. गुरूवारी रात्री या गाड्या ढोसी गावाजवळच्या भारत पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी थांबल्या होत्या.
डिझेल भरून झाल्यानंतर सर्व 19 वाहने रतलामच्या दिशेने रवाना झाली. काही अंतर पुढे गेल्यानंतर एक-एक करून सर्व कार अचानक बंद पडू लागल्या. वाहन चालकांना डिझेलबाबत शंका आल्यानंतर त्यांनी याबाबत पेट्रोल पंपावर जाऊन तक्रार केली. गाड्या नादुरस्त झाल्याची माहिती मिळताच प्रशासकीय अधिकारी तातडीने तिथे दाखल झाले.
सर्व गाड्यांच्या इंधन टाकीतून डिझेल बाहेर काढण्यात आले, तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. टाकीमध्ये डिझेल ऐवजी पाणी होते. या घटनेमुळे संपूर्ण प्रशासनच हादरून गेले. यादरम्यान आणखी काही वाहनचालक हीच तक्रार घेऊन तिथे आले. पेट्रोल पंप चालकाकडून फसवणुकीचा प्रकार लक्षात आल्यानंतर तातडीने पंप सील करण्यात आला. तर मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी दुसरी वाहने आणण्यात आली.
दरम्यान, या घटनेनंतर भारत पेट्रोलियम कंपनीचे अधिकारीही पेट्रोल पंपावर दाखल झाले. गाडीतील टाक्यांमध्ये 20 लिटर डिझेल टाकण्यात आले होते. त्यामध्ये जवळपास 10 लिटर पाणी असल्याचे तपासात समोर आले. याबाबत अधिकाऱ्यांनी अधिक तपासणी केल्यानंतर डिझेलचा साठा असलेल्या टाकीमध्ये पावसाचे पाणी गेल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.