Tamil Nadu Police sarkarnama
देश

Custodial Death Case : कोठडीतील मृत्यू प्रकरणात कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; 9 पोलिसांना मृत्युदंड अन् कुटुंबाला 1.40 कोटी भरपाई

Tamil Nadu Custodial Death Case : कोरोना काळात घातलेल्या निर्बंधांचा भंग करत दुकान चालू ठेवणाऱ्या दोघांना ताब्यात घेत पोलिसांनी कोठडीत जबर मारहाण केली होती.

Aslam Shanedivan

  1. मदुराई न्यायालयाने कोठडीतील मृत्यू प्रकरणात 9 पोलिसांना फाशीची शिक्षा सुनावली

  2. मृतांच्या कुटुंबीयांना 1.40 कोटी रुपयांची भरपाई देण्याचा आदेश

  3. कोरोना निर्बंध उल्लंघन प्रकरणातून अटक झाल्यानंतर कोठडीत मारहाणीमुळे मृत्यू

chennai News : व्यावसायिक पिता-पुत्राच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणात तमिळनाडूच्या मदुराई सत्र न्यायालयाने नऊ पोलिसांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. तसेच, मृतांच्या कुटुंबीयांना १.४० कोटी रुपयांची भरपाई देण्याचा आदेशही दिला आहे.

ही घटना १९ जून २०२० रोजी सथानकुलम पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडली होती. जयराज आणि त्यांचा मुलगा बेनिक्स एक दुकान चालवत होते. कोरोना महासाथीमुळे त्यावेळी निर्बंध होते आणि त्या निर्बंधांचा भंग करीत, या दोघांनी दुकान चालू ठेवल्याचा ठपका ठेवीत पोलिसांनी त्यांना अटक केली होती. कोठडीमध्ये बेदम मारहाण झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले.

उपचार सुरू असताना २२ जून रोजी बेनिक्सचा, तर २३ जून रोजी जयराज यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात एक पोलिस निरीक्षक, दोन पोलिस उपनिरीक्षकांसह दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील विशेष पोलिस उपनिरीक्षक पौलदुराई याचा ऑगस्ट २०२०मध्ये कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला होता. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला होता.

आपल्याला दहा मिनिटांच्या अंतराने रात्रभर मारहाण करण्यात आली होती. तसेच टेबलावर झोपवूनही मारहाण करण्यात आली, असे बेनिक्सने नातेवाइकांना सांगितले होते, असे सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये म्हटले होते.

सर्वोच्च न्यायालयाने २०११मध्ये मार्गदर्शक तत्त्वे घालून दिल्यानंतरही या घटना सुरूच आहेत. या घटनेमध्ये पीडितांचे रक्ताळलेले कपडे नातेवाइकांना देताना, ते नष्ट करण्यासाठी धमकावले होते, असे न्यायालयाच्या निकालात नमूद केले आहे. तसेच, मृतांच्या कुटुंबीयांना १.४० कोटी रुपयांची नुकसानभरपाई द्यावी आणि ही भरपाई या पोलिसांकडून वसूल करण्यात यावी, असेही या निकालात म्हटले आहे.

'पोलिसच कायद्याच्या विरोधात'

न्यायालयाने २३ मार्च रोजी या आरोपींना दोषी ठरविले होते. 'कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असणारे पोलिसच कायद्यांच्या विरोधात वागतात आणि कोणताही गुन्हा दाखल नसणाऱ्या या पिता-पुत्रांवर क्रूरपणे मारहाण करत कायद्यांच्या विरोधात वर्तन केले आहे.

ही दुर्मिळातील दुर्मीळ घटना आहे,' असे निरीक्षण न्या. जी. मुथुकुमारन यांनी नोंदविले. या घटनेचे गांभीर्य पाहता, आरोपींना जन्मठेपेची शिक्षा पुरेशी ठरणार नाही. या निकालामुळे भविष्यात अशा घटना घडण्याला प्रतिबंध लागेल, असेही निकालात नमूद करण्यात आले आहे.

FAQs :

1. ही घटना कुठे घडली होती?
ही घटना तामिळनाडू राज्यातील मदुराई येथे घडली होती

2. न्यायालयाने काय निर्णय दिला?
न्यायालयाने 9 पोलिसांना फाशीची शिक्षा सुनावली

3. कुटुंबाला काय दिले जाणार आहे?
मृतांच्या कुटुंबीयांना 1.40 कोटी रुपयांची भरपाई देण्याचा आदेश दिला आहे

4. प्रकरणाची पार्श्वभूमी काय होती?
कोरोना काळातील निर्बंध उल्लंघन केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती

5. मृत्यू कसा झाला?
कोठडीत मारहाण झाल्यामुळे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT