

अकोल्यात पोलिस ठाण्यातील लॉकअपमध्ये महिला आरोपीकडून गंभीर आरोप करण्यात आले.
एका ASI अधिकाऱ्यावर गैरवर्तन आणि अयोग्य मागणी केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे.
Akola Police Crime News : काहीच दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील अलीगडमध्ये एका बलात्कार पीडितेची मदत करण्याऐवजी, पोलीस कॉन्स्टेबलने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. या घटनेमुळे पोलिस दलाची संपूर्ण देशात छी-थू होत असतानाच आता महाराष्ट्रात देखील अशीच घटना उघडकीस आली आहे. यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. तर ही घटना अकोल्यात समोर आली असून पोलीस ठाण्याच्या लॉकअप'मध्ये असणाऱ्या महिलेकडे 'ASI पोलिस अधिकाऱ्याने' शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप होत आहे. याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली असून आता महाराष्ट्र पोलिसांचे 'सदरक्षणाय खलनिग्रहणाय'या ब्रीदवाक्याचाच पोलिस दलास विसर पडल्याचे दिसत आहे.
उत्तर प्रदेशातील अलीगडमध्ये पोलीस कॉन्स्टेबलच्या एका कृतीने देशात पोलिस दलाची मान खाली गेली होती. या कॉन्स्टेबलने बलात्कार पीडितेची मदत करण्याऐवजी, तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली होती. तुला न्याय हवा असेल आणि आरोपीवर कारवाई करायची असेल, तर तुला मला खूश करावे लागेल, माझ्यासोबत झोपावे लागेल, अशी संतापजनक मागणी त्याने केली होती. यानंतर हा सर्व प्रकार त्या पीडितेने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार करत सांगितला. ज्यानंतर त्या संबंधित कॉन्स्टेबल कारवाई करण्यात आली होती.
एकीकडे या प्रकारामुळे पोलिसांची छबी डागळली गेली असतानाच आता महाराष्ट्रातील अकोला पोलिस दलातही अशीच धक्कादायक आणि वर्दीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. येथे अटकेत असलेल्या आरोपी महिलेकडे एका 'ASI पोलिस अधिकाऱ्याने' शरीर सुखाची मागणी केली आहे. या ASI पोलिस अधिकाऱ्याचे नाव राजेश जाधव असून त्याचा हा व्हिडीओ आता 'साम'च्या हाती लागला असून तो व्हायरल होत आहे.
या प्रकरणी मिळालेली माहिती अशी की, ८० लाखांच्या फसवणूक प्रकरणात एका महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. तिला येथील सिव्हिल पोलीस ठाण्याच्या लॉकअप ठेवण्यात आलं होतं. यावेळी ASI राजेश जाधव याने त्या आरोपी महिलेला तुझ्या मुलीच वय काय? असा प्रश्न विचारत 10 हजार रुपये देतो, रात्रभर मुलीला माझ्याकडे पाठव, अशी मागणी केली.
याप्रकरणानंतर संतापलेल्या संबंधित महिलेने अशा स्वरूपाची मागणी करणाऱ्या एएसआयच्या कानशिलात मारण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र या घटनेनंतर पोलीस ठाण्यात मोठा गोंधळ उडाला. तर या प्रकरणानंतर आर्थिक गुन्हे शाखेचे प्रमुख अनिल जुमळे या ठिकाणी दाखल झाले.
यानंतर या संपूर्ण प्रकरणाची माहिती वरिष्ठांना देण्यात आली असून आता चौकशी सुरु झालीय. तसेच या प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तर या प्रकरणात ASI राजेश जाधव याच्यावर निलंबनाची कारवाई होईल अशी माहिती वरिष्ठांनी दिली आहे. दरम्यान आता व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत या प्रकरणानंतर संबंधित'एएसआय'च्या कानशिलात देखील मारण्याचा प्रयत्न वरीष्ठ अधिकाऱ्याने केल्याचे दिसून येत आहे. तर तो पोलीस वर्दीवर असल्यामुळे वरिष्ठ पोलिसांनी स्वत: ला रोखल्याचे दिसत आहे. तर 'तू, वर्दी घातली असून असं कृत्य करताना लाच कशी वाटत नाही', असा सवाल वरिष्ठांनी त्या ASI ला केल्याचे मोबाईलच्या कॅमेरामध्ये कैद झाले आहे.
तर घडलेल्या या घटनेनंतर अकोला पोलिसांची मान शरमेने खाली गेली असून पोलीस ठाण्यातचं महिला असुरक्षित असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. यामुळे पुन्हा एकदा महिला सुरक्षेतेचा मोठा प्रश्न ऐरणीवर आला असून 'सदरक्षणाय खलनिग्रहणाय'हे ब्रीदवाक्य सतत म्हणाणारे पोलिसच महिलांचे लचके तोडायचा उठल्याचे दिसत आहे.
1. ही घटना कुठे घडली?
अकोला येथील पोलिस ठाण्यात ही घटना घडली.
2. कोणावर आरोप करण्यात आला आहे?
एका ASI पोलिस अधिकाऱ्यावर आरोप करण्यात आला आहे.
3. काय आरोप आहेत?
महिला आरोपीकडे अयोग्य मागणी केल्याचा आरोप आहे.
4. पोलिसांनी काय कारवाई केली?
संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे.
5. या प्रकरणाचा परिणाम काय होऊ शकतो?
पोलिस व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊन अधिक तपास होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.